नागपूर समाचार : काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. सरकारमधील नेते आणि आमदारांना सत्तेचा माज चढला असून जनतेचे प्रश्न दुय्यम ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रहार आणि शिवसेना विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले की, हा त्या पक्षांचा अंतर्गत विषय असला तरी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन निर्णय घ्यायला हवा. “राज्यात सातत्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. वीज धोरण आणि सोलर प्रकल्पांच्या नावाखाली सामान्य नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
एमएलसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सूचक वक्तव्य करत सांगितले की, ३० तारीख निर्णायक ठरणार आहे. “पूर्वीही बिनविरोध निवडणुकीचे दावे करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात चुरस झाली. त्यामुळे अंतिम चित्र ३० तारखेनंतरच स्पष्ट होईल,” असे ते म्हणाले.
मीरा भाईंदर येथील घटनेवर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी सरकारवर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप केला. “भाषा आणि धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडली जात आहे. याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत,” असे ते म्हणाले. तसेच शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना बाजूला सारण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
गोविंद पानसरे प्रकरणावर बोलणे टाळताना त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “सरकारमधील लोकांना माज आला आहे, त्यामुळे अशा वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्यात अर्थ नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर अत्याचार प्रकरणावर त्यांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. “गृहखात्याचा दबदबा राहिलेला नाही. पोलीस प्रशासन सैलावले असून महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. आज राज्यात कुठेही महिलांना सुरक्षित वाटत नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर बोलताना पटोले यांनी त्यांचे समर्थन केले. “लोकशाहीत प्रत्येक पक्षात काही ना काही धोके असतात. मात्र राहुल गांधी यांनी संयमी आणि सकारात्मक भूमिका मांडली. त्यात चुकीचं काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पटोले यांच्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.




