दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात
नागपूर समाचार : मौर्य सम्राट अशोका यांच्यानंतर मानवमुक्तीचे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र गतिमान केले. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर ऐतिहासिक रक्तविहीन क्रांती घडवून बौद्ध धम्माला पुनर्जीवित केले. एवढेच नव्हे तर सध्याच्या काळात कोलंबिया ते लंडन… अशी बाबासाहेबांच्या कार्याची जगात दखल घेतली जात आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ससाई अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तामिळनाडूचे वैज्ञानिक आणि आंबेडकरी प्रबोधनकार डॉ. डी. आर. एस. शेखर, डॉ. आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी (उंटखाना)चे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी, नालंदा अकॅडमी (वर्धा) चे संचालक अनुप कुमार आणि आकाश खोब्रागडे उपस्थित होते.
ससाई पुढे म्हणाले, देशातील वंचित आणि पीडित घटकांना मानसिक गुलाम करून त्यांच्यावर अनेकांनी राज्य केले. परंतु, गुलामांना मुक्त करून त्यांच्या ह्रदयात राज्य करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या पाठीवर एकमेव आहेत. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील ग्रंथालयात त्यांच्या प्रतिमेसह जीवनकार्यावर ठळक माहिती आहे. ब्रिटनमधील लंडन स्कूल आॅफ एकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांची एकमेव प्रतिमा आहे. आता अमेरिकन तत्त्वज्ञान संस्थेकडून त्यांच्या नावाने जागतिक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या मूलमंत्राचे अनुसरण शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहणार आहे, असे सांगतानाच बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करून बुद्धाचा धम्म हा खरा वैज्ञानिक धम्म असल्याचे ससाई यांनी सांगितले.
याप्रसंगी अनुप कुमार म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मोठ्या संघर्षाने नालंदा अकॅडमी सुरू केली. अनेक विद्यार्थी या अकॅडमीतून घडविले असून, या अकॅडमीला प्रत्येक पालकांनी मुलासोबत भेट द्यावी. यावेळी डीएसआर शेखर म्हणाले, भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला एकसंघ ठेवण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. भदंत धम्म सारथी, आकाश खोब्रागडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन आणि आभार भंते राहुल बोधी यांनी केले. यावेळी बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.




