रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई
नागपूर समाचार : भीमसैनिक, अनुयायी तसेच उपासक, उपासीकांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, डॉ. आंबेडकर महाविद्यालय आणि डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्म सेनानायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले,एन.आर. सुटे, आनंद फुलझेले, प्राचार्या दीपा पान्हेकर उपस्थित होत्या. बुद्ध वंदनेनंतर रक्त संकलनाला सुरुवात झाली. रात्री आठ वाजेपर्यंत रक्तसंकलन सुरू होते. रक्तसंकलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्त संकलनाचे काम इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेयो) डॉक्टर चेतन मेश्राम यांच्या नेतृत्वातील पथकाने केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी समितीचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षक एनसीसी,एनएसएस तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.




