- Breaking News, नागपुर समाचार

रामटेक समाचार : दिव्यांग सक्षमीकरणासाठी उपक्रमांचा अनोखा संगम; आशीष जयस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त लाखोंची मदत

रामटेक समाचार : राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत दिव्यांग बांधवांसाठी विशेष मार्गदर्शन व सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी शितलवाडी येथील स्नेहसदन विशेष शाळेत आयोजित या शिबिरात दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरात दिव्यांग सहाय्यता पोर्टल नोंदणी, अर्जुन पोर्टलद्वारे साहित्य मागणी, संजय गांधी निराधार योजनेसाठी ई-केवायसी, युडीआयडी नोंदणी तसेच दिव्यांग खेळाडूंकरिता उपलब्ध असलेल्या अर्थसहाय्य योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष फायदा मिळावा यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय स्तरावर मदत करण्यात आली.

यावेळी दिव्यांगांच्या ‘दिव्य रंग’ या समूहास २१,००० रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी आदेश वितरित करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे ८ लाखांहून अधिक रकमेची मदत विविध स्वरूपात देण्यात आली. यामध्ये श्रवणयंत्रांचे वाटप, शैक्षणिक साहित्य वितरण आणि आवश्यक सुविधांचा समावेश होता.

याशिवाय शैक्षणिक व पुनर्वसन उपक्रमांना चालना देण्यासाठी संगणक कक्ष व डिजिटल बोर्ड उभारणीसाठी १० लाख रुपये, साउंडप्रूफ थेरपी कक्षासाठी ८,५१,६०६ रुपये, तसेच तालुक्यातील चार दिव्यांग शाळांसाठी १० किलोवॅट सोलर सिस्टिम उभारणीसाठी सुमारे २४ लाख ४४ हजार ४०८ रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक किटचे वितरणही करण्यात आले.

हा संपूर्ण उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता, समाजातील दिव्यांग बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात आला. दिव्यांगांचे सक्षमीकरण, स्वावलंबन आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.