- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : नागपूर येथे ‘एम्ब्रियो जैवतंत्रज्ञान’ प्रयोगशाळेचे उद्घाटन नितीनजी गड़करी त्यांच्या हस्ते झाले

आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा – नितीन गडकरी

नागपूर : एम्ब्रियो (भ्रुण) ट्रान्सफर टेक्नॉलॉजी किफायतशीर दरात नागपूर जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. ज्या गाई दोन ते पाच लिटर दूध देतात त्यांच्यामध्ये पंधरा ते वीस लिटर दूध देण्याची क्षमता विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगी ठरेल. याचा जास्तीत जास्त प्रसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागपूरच्या ग्रामीण भागात करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले.

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, एम्ब्रियो (भ्रुण) ट्रान्सफर टेक्नोलॉजी आयव्हीएफ मजबुतीकरण प्रकल्पाखाली महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ , नागपूर येथे ‘एम्ब्रियो जैवतंत्रज्ञान’ प्रयोगशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी, केंद्र आणि राज्य सरकार अशा प्रकल्पासाठी विशेष अनुदान देईल असे सांगितले. सुनील केदार यांनी नितीन गडकरी यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार्या अभिनव कल्पनांचे कौतुक केले व ग्रामीण भागातील भूमीहीन मजुरांना शेळीपालन हा उत्तम पर्याय आहे. शेळीच्या दुधापासून मिळणार्या चीजला चांगली मागणी असून या संदर्भातील प्रकल्प पोहरा येथे टाकण्यात येत असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली. ग्रामीण भागात पशु वैद्यकीय अधिकारी त्वरित पोहोचण्यासाठी सुमारे 44 (व्हेटर्नरी व्हॅन)पशुवैद्यकीय म्बुलन्स या राज्यात चालू करणार असून त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 1962 सुद्धा लवकरच सुरु होणार असल्याची माहिती केदार यांनी यावेळी दिली. 

सिव्हिल लाईन स्थित मत्त्स्यविज्ञान विभागाच्या जवळ असलेल्या या एम्ब्रियो ट्रान्सफर जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेत कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध असून या प्रकल्पाचे संचालक सुनिल सातपुरे यांनी याप्रसंगी एम्ब्रियो ट्रान्सफर बायोटेक्नॉलॉजी संदर्भात सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, एम्ब्रियो ट्रान्सप्लांट तसेच गाईंचे प्रेग्नेंसी डायग्नोसिस इत्यादी संदर्भात माहिती पूर्ण विवेचन केलं. एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी साठी प्रति गायीसाठी पाच हजार रुपये खर्च येईल असे सांगितल्यावर विद्यापीठाने सविस्तर प्रकल्प अहवाल आणि प्रस्ताव सादर करून केंद्राला पाठवाव्यात यासंदर्भातील सर्व सहकार्य केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंग यांच्या सहकार्याने करता येईल असं गडकरी यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य सुधीर दिवे, जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.