- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : विराट हिंदू संमेलनाचा’ दिमाखदार समारोप, मिनाक्षी सेहरावत यांच्या व्याख्यानाने हिंदू शक्तीचे जागरण

नागपूर समाचार : “समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेला भूभाग म्हणजे भारतवर्ष असून येथे राहणारे सर्वजण हिंदू आहेत,” या ब्रीदवाक्याला स्मरून नागपूरच्या महाल भागात आयोजित ‘विराट हिंदू संमेलनाचा’ रविवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. श्रद्धेय शंकरराव तत्ववादी परिसर, भाऊजी दप्तरी शाळेजवळ आयोजित या मुख्य सोहळ्याला नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. प्रखर हिंदुत्वचिंतक कु. मिनाक्षी सेहरावत यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थितांना राष्ट्रभक्ती आणि संस्कृती रक्षणाचे आवाहन केले.

रविवारी सकाळी प्रभातफेरी आयोजित करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी मुख्य सभेला सुरुवात झाली. मिनाक्षी सेहरावत यांनी कुटुंबातून मिळणाऱ्या संस्कारांचे आणि प्राचीन गुरुकुल पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती हीच काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी हिंदू शक्तीच्या जागृतीवर भर दिला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक मा. श्री. राजेशजी लोया यांची प्रमुख उपस्थिती होती.

विराट हिंदू संमेलन समितीच्या वतीने १ मार्चपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजता श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी ७ वाजता भव्य महाआरती संपन्न झाली. यामध्ये ४ मार्चला डॉ. हेडगेवार भवन येथे मा. श्री. दयाशंकर तिवारी यांचे ‘वंदे मातरम’ विषयावर कथाकथन पार पडले. ५ मार्चला डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित ‘युगप्रवर्तक’ हा संगीत कार्यक्रम सादर झाला.

६ मार्चला श्री भूत इतका गणपती मंदिर परिसरात अमर कुळकर्णी आणि संचाने अथर्वशीर्ष आवर्तने सादर केली. तसेच ७ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग आणि बँड पथकाद्वारे देशभक्तीपर गीतांचे वादन करण्यात आले. “सज्जन शक्तीचे संघटन हेच राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची ओळख आहे,” हा संदेश या संमेलनाच्या माध्यमातून देण्यात आला.