- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : दक्षिण-पश्चिम नागपुरातील प्रभाग-३३ वर ‘पीरिपा’चा दावा

मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा

प्रा. जोगेंद्र कवाडे सर व जयदीप कवाडेंचे मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत खलबत

नागपूर समाचार : राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण–पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३३ मध्ये अनुसूचित जातीतील मतदार निर्णायक भूमिका बजावतात. त्यामुळे महायुतीकडून या प्रभागातील राखीव ‘अ’ प्रवर्गाची जागा पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) करिता सोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीपभाई जोगेंद्र कवाडे यांनी गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याची माहिती जयदीप कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रभाग ३३ मधून उच्चशिक्षित, राजकीय विश्लेषक, पत्रकार तसेच आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व पीयूष पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणीही पीरिपाकडून करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीसह महायुतीतील घटक पक्षांसाठी अनुकूल ठरणाऱ्या या प्रभागात अनुसूचित जातीतील मतदारसंख्या लक्षणीय असल्याने, निवडणूक निकालाच्या दृष्टीने हा प्रभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत लाँग मार्चचे प्रणेते व पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पीरिपाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत यांची उपस्थिती होती.

जयदीप कवाडे यांनी सांगितले की, पीयूष पाटील हे गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक चळवळीत सक्रिय असून, ते आंबेडकरी विचारधारेचे अभ्यासू आणि कृतीशील युवा नेतृत्व आहे. अशा चेहऱ्याला संधी दिल्यास महायुतीला निश्चितच राजकीय फायदा होईल. बी.ए., एम.ए. (मास कम्युनिकेशन) शिक्षण घेतलेले पीयूष पाटील हे गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, न्याय, बंधुता आणि आत्मसन्मान या विचारांवर विश्वास ठेवत त्यांनी शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा, मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम केले आहे.

प्रभाग ३३ मधील दलित वस्त्या, वसाहती आणि मध्यमवर्गीय परिसरात त्यांचा थेट व सातत्यपूर्ण जनसंपर्क आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर केवळ आवाज उठवणे नव्हे, तर प्रशासनाशी पाठपुरावा करून प्रत्यक्ष उपाय काढणे, ही त्यांची ओळख आहे. पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवामुळे त्यांना प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची ताकद लाभली आहे, अशा शब्दात जयदीपभाई कवाडे यांनी पीयूष पाटील यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केला. प्रभाग ३३ हा केवळ एक महापालिका वॉर्ड नसून, तो आंबेडकरी चळवळीचा, सामाजिक न्यायाचा आणि राजकीय समतोलाचा कस लागणारा प्रभाग मानला जातो. या प्रभागात अनुसूचित जाती, विशेषतः अनुसूचित जाती ‘अ’ मधील मतदारांची संख्या लक्षणीय असून, निवडणुकीचा निकाल ठरवण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरते. प्रभाग-३३ हा आंबेडकरी चळवळीचा मजबूत पाया असलेला प्रभाग आहे. येथे अनुसूचित जाती ‘अ’ मधील मतदार निर्णायक भूमिका बजावतात. महायुतीने ही जागा पीरिपासाठी सोडल्यास, सामाजिक न्यायाचा विश्वास अधिक दृढ होईल, असे जयदीप भाई जोगेंद्र कवाडे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्याने विशेष महत्त्व

प्रभाग क्रमांक ३३ हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण–पश्चिम विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने, येथे उमेदवार निवडताना केवळ निवडणुकीचे गणित नव्हे तर सामाजिक समतोल आणि वैचारिक संदेशही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात पीपल्स रिपब्लिकन पार्टीला मोठा जनाधार लाभलेला आहे. पीरिपामध्ये सक्रिय असलेल्या आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्वाला पुढे आणल्यास, तो निर्णय केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित न राहता दीर्घकालीन सामाजिक विश्वास निर्माण करणारा ठरू शकतो, असे मत पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी व्यक्त केले.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे ३ तर काँग्रेसचा १ उमेदवार निवडून आला होता. मात्र, बसपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता आणि विजयाचे अंतर अत्यंत कमी होते. यावरून या प्रभागातील आंबेडकरी मतदारांचे स्वतंत्र अस्तित्व आणि राजकीय ताकद स्पष्टपणे दिसून येते. सध्या भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने संभाव्य बंडखोरीचा धोका नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीला संधी देणे हा राजकीयदृष्ट्या परिपक्व आणि दूरदृष्टीचा निर्णय ठरू शकतो, असेही जयदीप कवाडे यांनी स्पष्ट केले.