मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा दुसरा दिवस
नागपूर समाचार : कवितासमान मोठमोठे विचार-घटना अगदी कमी वेळेत सादर करणारी नाट्य कलाकृती म्हणजे एकांकिका. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, मोहगाव (झिल्पी) च्या वतीने लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सुरु असलेल्या राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट एकांकिकांच्या पहिल्या मुख्यमंत्री महाकरंडक स्पर्धेत अशाच काही सुंदर कलाकृती दररोज सादर होत आहेत.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. २४) सादर झालेल्या ‘लेखिका’ आणि ‘वि. प्र.’ या एकांकिकांनी सुरेख विषयाला हात घालत प्रेक्षकांच्या हृदयाच्या छेद दिला.
प्रसिद्ध अभिनेते मुकुंद वसुले, शरद चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी, रवींद्र भुसारी, प्रफुल माटेगांवकर, परीक्षक अशोक समेळ, शकुंतला नरे आणि डॉ. सतीश पावडे उपस्थित होते. संचालन वैदेही चवरे यांनी केले.

त्यानंतर एम. स्टुडिओतर्फे मनीष चौधरी लिखित व दिग्दर्शित ‘लेखिका’ या एकांकिकेने साधारण कविताप्रेमीचे लेखिकेला पाठवलेले पत्र नामसाधर्मामुळे एका वारंगणेच्या हाती पडते आणि सुरु होते अदृश्य प्रेमाचा प्रवास. या प्रवासातून वारंगणेची होणारी लेखिका प्रेक्षकांना उमजते. एकांकिकेत श्रद्धा तेलंग, रोशनी सेलोकर, मनिष चौधरी, रुचिता पंडीया, समर बोबडे, प्रद्युम्न्न बायस्कर, उमेश मरडवार, रवी गिहे, नितीन ठाकरे, शिवम दुधबर्वे, शिल्पा बडे, कोमल पारधी यांच्या भूमिका होत्या. प्रकाश योजना – मिथुन मित्रा, संगीत – अजिक्य थेर, नेपथ्य -योगेश मेहर, वेशभूषा आणि रंगभूषा ललित पिंपळघरे आणि मयूर पंडीत यांनी साकारल्या.
त्यानंतर, थोरवी थियेटरतर्फे तन्मय गंधे लिखित व दिग्दर्शित ‘वि. प्र.’ ही एकांकिका सादर झाली. रौनक पळसापुरे, रुद्र भद्रे, आकांक्षा भाके, शिवम मस्के, निश्चय बेल्लानी, जुनैद फजलानी, आस्था नितीनवरे, तेजस्विनी सदावर्ती, ऋतुजा कुमरे, तन्मय गंधे यांनी एकांकिकेतील पात्रे साकारली.
नेपथ्य – शिवम मस्के, पार्श्वसंगीत – स्तवन गवारे, प्रकाश योजना प्रणव कोरे व वरुणराज नागुलवार यांच्या होत्या.
आज तीन एकांकिका
मुख्यमंत्री महाकरंडकात मंगळवारी (दि. २५) तीन एकांकिका सादर होतील. संध्याकाळी ६ वाजता अमरावती येथील अद्वैत बहुद्देशीय संस्थेद्वारे विशाल तराळ लिखित व दिग्दर्शित ‘चित्रांगदा’, ७ वाजता नागपूरच्या श्री. रामचंद्र बहुद्देशीय संस्थेद्वारे चैतन्य डुबे दिग्दर्शित ‘वीर बाबुराव’ आणि रात्री ८ वाजता मुंबई (डोंबिवली) येथील स्वामी नाट्यांगणतर्फे यश नवले लिखित व दिगदर्शीत ‘नवरा आला वेशीपाशी’ ही एकांकिका सादर होईल.




