- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : “संत्रा” स्पेन, इस्रायल… व्हाया विदर्भ’ पुस्तक शेतकऱ्यांसाठी ठरेल मार्गदर्शक – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

तुलनात्मक अभ्यासावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर समाचार : ‘संत्रा : स्पेन, इस्रायल… व्हाया विदर्भ’ हे पुस्तक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकाच्या मदतीने नव्या प्रयोगांची तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची प्रेरणा शेकऱ्यांना मिळेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

ना. श्री. गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते अॅग्रोव्हिजन प्रदर्शनात झाले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आनंदराव राऊत, माजी आमदार सुधीर पारवे, जयकुमार वर्मा, सतीश शिंदे, सुधीर दिवे, डॉ. विवेक भोईटे, अरविंद गजभिये, श्रीधर ठाकरे, मोरेश्वर वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘या पुस्तकात इस्रायल, स्पेन आणि विदर्भातील पारंपरिक संत्रा लागवडीबाबत अभ्यासकांनी तुलनात्मक निरीक्षण मांडले आहे. काही महिन्यांपूर्वी विदर्भातील ४० संत्रा उत्पादकांची टीम स्पेन येथील व्हॅलेन्शिया संत्रा लागवडीचा अभ्यास करण्यासाठी गेली होती. मी स्वतः या शेतकऱ्यांसोबत दौऱ्यावर होतो. व्हॅलेन्शिया येथील संत्रा लागवडीची पद्धत, येथील नर्सरी, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग इतर अनेक गोष्टींची इत्तंभुत माहिती आम्ही घेतली.’ 

स्पेनवरून आल्यानंतर आम्ही संत्रा उत्पादकांची एक कार्यशाळा देखील नागपुरात घेतली. यामध्ये जवळपास चारशे संत्रा उत्पादक सहभागी झाले होते. या कार्यशाळेचा उत्तम परिणाम झाला. त्यानंतर इस्रायल, स्पेन आणि विदर्भातील पारंपरिक संत्रा लागवडीच्या संदर्भात तंत्रशुद्ध निरीक्षण मांडणारी माहिती पुस्तकाच्या रुपात यावी अशी कल्पना होती. त्यानुसार हे पुस्तक आज शेतकऱ्यांच्या हाती देताना आनंद होत आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. 

टँगो संत्रा, नागपुरी संत्र्याची निर्यात क्षमता, इंडो-इस्रायल संत्रा लागवड, संत्रा उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI)चा वापर, हवामान बदलाचे परिणाम, फळ व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, हार्वेस्टिंग, प्रोसेसिंग, मार्केटिंग, छाटणीचे तंत्रज्ञान याची माहिती एका पुस्तकात मिळावी, अशी इच्छा होती. त्यानुसार या पुस्तकात आम्ही स्पेन, इस्रायल आणि विदर्भातील संत्रा लागवडीचे सध्याचे चित्र मांडले आहेच. शिवाय कोणत्या नव्या बदलांची गरज आहे, हे सांगताना एआयचा कसा फायदा होऊ शकतो हे देखील तांत्रिक निकषांचा आधार घेऊन मांडले आहे. त्याचवेळी वाशीमसारख्या आकांक्षी (अस्पायरन्ट) जिल्ह्यासह वऱ्हाडात संत्रा उत्पादकांनी केलेले यशस्वी प्रयोग देखील यात आहेत, असे ना. श्री. गडकरी म्हणाले. नितीन कुळकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या पुस्तकाचे संकलन-संपादन नितीन नायगांवकर यांनी केले आहे. तर ना. श्री. गडकरी यांचे सहायक खासगी सचिव डॉ. प्रवीण भालेराव यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले आहे. नितीन कुळकर्णी यांनी संपादकीय समन्वयाची भूमिका पार पाडली. पुस्तकाचे मुखपृष्ठ, सजावट व मांडणी राजेंद्र क्षीरसागर यांची आहे.

या अभ्यासकांचे योगदान

‘संत्रा : स्पेन, इस्रायल… व्हाया विदर्भ’ या पुस्तकामध्ये ना. श्री. गडकरी यांचा ‘टँगो संत्रा : वैदर्भीय शेतकऱ्यांसाठी वरदान’ हा लेख आहे. याशिवाय डॉ. सी. डी. मायी, विलास शिंदे, डॉ. डी.एम. पंचभाई, डॉ. विवेक भोईटे, डॉ. प्रवीण भालेराव, विशाल लंगोटे, राकेश मानकर, डॉ. गोपाल भक्ते, नवीनकुमार पेठे, डॉ. सुधीर भोंगळे, विनोद इंगोले, गोपाल हागे, नितीन कुळकर्णी, मनोज जवंजाळ, डॉ. विनोद राऊत, सचिन कुळकर्णी यांच्या लेखांचा समावेश आहे.