- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या कार्यालयाचे उद्घाटन 

नागपूर समाचार : असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) च्या ग्लोकल मॉल, सीताबर्डी, नागपूर येथील कार्यालयाचे सोमवारी राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्‍यात आले. 

या कार्यक्रमाला माजी महापौर प्रा. अनिल सोले, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, सचिव डॉ. विजयकुमार शर्मा आणि कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी यांची मंचावर उपस्थित होती.

उद्योजकांना एकत्र आणणे महत्त्वाचे – पंकज भोयर

गृह व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, “उद्योजक अत्यंत व्यस्त असतात. त्यांना एका मंचावर आणून शासनाकडे प्रलंबित विषय मांडणे आणि विदर्भातील उद्योगांना जागरूक करणे ही एआयडीसारख्या संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे.” त्यांनी टायगर टुरिझमच्या प्रचंड संभाव्यतेवर भाष्य केले. यामुळे प्रदेशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे ते म्‍हणाले.

एआयडीचे योगदान उल्लेखनीय – ॲड. आशिष जयस्वाल

वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, “विदर्भ व नागपूरच्या विकासात एआयडी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य घडवण्यासाठी इंडस्ट्री पॉलिसीचे पालन व प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असून कोळसा, मँगनीजसारख्या संसाधनांचा बाहेर जाणारा प्रवाह रोखणे आणि स्थानिक विकासाला चालना देणे गरजेचे आहे. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या विकासातील सर्वाधिक योगदान देणारा ठरू शकतो, असे ते म्‍हणाले.

ते म्हणाले, “२०४७ च्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेत पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांना सर्वाधिक प्राधान्य द्यावे लागेल. व्हिजन डॉक्युमेंट 2047 योग्य रीतीने राबविले तर राज्य देशाच्या आर्थिक विकासाला मोठे योगदान देईल.”

आशिष काळे यांनी १६ नोव्हेंबरला एआयडीने दोन वर्षे पूर्ण केली असल्‍याचे सांगत एआयडीचे प्रवर्तक नितीन गडकरी यांनी दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विदर्भातील सर्व उद्योजकांना एका मंचावर आणण्याची दूरदृष्टी आम्ही प्रत्यक्षात आणत आहोत.”

कार्यक्रमात एआयडीच्‍या इंटेरिअर डिझायनर रिद्धी बागडी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. विजयकुमार शर्मा यांनी एआयडीचा वार्षिक अहवाल सादर केला. लॉजिस्टिक पॉलिसी, टुरिझम पॉलिसीमधील एआयडीच्‍या योगदानाचा उल्‍लेख करताना ते म्‍हणाले की येत्‍या जानेवारी 2026 मध्‍ये जीसीसी परिषदेचे आयोजन केले जाणार असून ‘अॅडव्‍हांटेज विदर्भ’ची तिसरी आवृत्‍ती फेब्रुवारी 2026 मध्‍ये होईल. याशिवाय, एआयडीने विदर्भ ग्लोबल फाउंडेशनच्‍या माध्‍यमातून मनपा, टाटा स्‍ट्राईव्‍हच्‍या सहकार्याने स्किल सॅटेलाईट सेंटर सुरू करण्‍यात येणार आहे. त्‍यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील केले. प्रणव शर्मा यांनी आभार मानले. 

यावेळी एआयडीचे उपाध्यक्ष गिरधारी मंत्री, कार्यकारी सदस्य प्रशांत उगेमुगे, राजेश रोकडे, अविनाश घुशे यांचीही उपस्थिती होती.