- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : अजय–अतुल च्या गीतांवर नागपूरकर झाले ‘झिंगाट’; खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025 चा धडाक्यात समारोप

नागपुर समाचार : हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सलग बारा दिवस रंगलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’चा मंगळवारी भव्य आणि दणदणीत समारोप झाला. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय–अतुल यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टने संपूर्ण पटांगण उत्साहाने भरून गेले आणि नागपूरकर अक्षरशः ‘झिंगाट’ झाले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय सुरवर पूजीत’ या भव्य कोरस गीताने झाली. त्यानंतर ‘नटरंग उभा’ या सुरेल धूनची ट्यून वाजताच एकच जल्लोष उसळला आणि अजय–अतुल यांची मंचावर दमदार एन्ट्री झाली. टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांनी त्यांचे स्वागत केले. अजय–अतुल यांनी यावेळी नागपूर विषयीचे प्रेम व्यक्त करताना 2009 मधील पहिल्या कॉन्सर्टची आठवण करून दिली. “पहिल्याच कॉन्सर्टला नागपूरने आम्हाला जबरदस्त प्रतिसाद दिला. मागील वर्षी आम्ही गडकरीजींना म्हणालो होतो की आम्हाला खासदारला यायचे आहे. त्यांनी यावर्षी समारोपाला बोलावले, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. 

नागपूरचे प्रेम आणि आशिर्वाद आम्हाला सतत नवे काम करण्याचे बळ देतात,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मैदानाबाहेर उभ्या शेकडो चाहत्यांनाही त्यांनी विशेष उल्लेख करत त्यांचेही आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत ‘इंद्र जिमि जंभ पर’ या दमदार गीताने पटांगणात गगनभेदी उत्साह निर्माण झाला. जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर मल्हार वारी, उधे ग अंबे उधे, तसेच देवी आरती – आई भवानी, गोंधळ मंडळा भवानी, का या नदीच्या पल्याड आईच डोंगर यांसारखी भक्तिरसाने ओतप्रोत गाणी सादर या जोडीने सादर केली आणि पटांगणात भक्तीभाव, संगीत आणि रोमांच यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

त्यानंतर मनीष आणि निहिराने ‘जीव दंगला’ सादर करत वातावरणात थिरकता रंग भरला. ऋषिकेश रानडे यांनी ‘मेरे नाम तू’, ‘अभी मुझ में कहीं’ आणि ‘मन उधाण वाऱ्याचे’ यांसारखी हृदयाला भिडणारी गाणी पेश करून प्रेक्षकांची मने जिंकली. नागपूरची कन्या शरयू दाते आणि अजय यांनी ‘धड़क है ना’ सादर करत संध्याकाळी ऊर्जावान केली.

अजय अतुल ने खेळ मांडला, अप्सरा, वाजले की बारा, अंबा बाई च गोंधळ ला ये, आताचं बया का, याडं लागलं, सैराट झालं जी, झींगाट अशी त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेली गीते सादर नागपूरकरांना वेड लावले.

प्रेक्षकांनी मोबाईल फ्लॅशलाइट्सने उजळवलेल्या पोस्टर्स, घोषणांचा गजर, आणि उत्साहाने भरलेली उपस्थिती या साऱ्यांनी महोत्सवाचा समारोप अविस्मरणीय बनवला. 

आजच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी, हुंडई इंडिया चे कार्यकारी संचालक जिओजीक ली, आमदार सुमित वानखेडे, आमदार समीर कुणावर, माजी खासदार अजय संचेती, माजी खासदार सुनील मेंढे, माजी आमदार मिलिंद माने, परिणय फुके, नाना शामकुळे या सर्वांनी दीपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली. कार्यक्रमाचे बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. 

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभले.

महोत्सवात अरिजित सिंग ला आणू – नितीन गडकरी 

श्रेया घोषाल, अजय अतुल, विशाल मिश्रा, शंकर महादेवन अशा अनेक जगप्रसिद्ध गायकांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा मंच गाजवला. भविष्यात तरुणाईचा लाडका गायक अरिजित सिंगला या मंचावर आणण्याचा प्रयत्न करू, असे नितिन गडकरी यांनी म्हणताच श्रोत्यांनी एकच जल्लोष केला. त्यावेळी ही जागा कमी पडेल, असे सांगताना नितीन गडकरी यांनी आताच ती कमी पडते. इच्छा असूनही श्रेया घोषाल यांच्या कार्यक्रमात अनेकांना आत घेऊ शकलो नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

समितीच्या सदस्यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. महोत्सवासाठी अनेक संस्थांचे सहकार्य लाभले त्यांचेही आभार व्यक्त करताना गडकरी यांनी आता हा महोत्सव केवळ देशापूरता मर्यादितं राहिलं नसून करोडो लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पाहिला असून याला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असल्याचे ते म्हणाले.