नागपूर समाचार : खासदार सांस्कृतिक महोत्सव–2025 च्या आठव्या दिवशीची संध्याकाळ रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली. ख्यातनाम संगीतकार विशाल भारद्वाज आणि ज्येष्ठ गायिका रेखा भारद्वाज यांच्या सुरेल प्रवाहात नागपूरकर अक्षरशः तल्लीन झाले.
हनुमाननगरातील क्रीडा चौकावरील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात झालेल्या लाईव्ह इन कॉन्सर्टने महोत्सवाची रंगत दुपटीने वाढवली.
संध्याकाळची सुरुवात रेखा भारद्वाज यांच्या मोहक आवाजातील ‘तेरे इश्क में’ या लोकप्रिय गीताने झाली. सुफी अन्दाजात त्यांनी ईश्वर स्मरणाचा संदेश देत “प्रकृतीचं देणं पुन्हा धरतीला परत द्यायला हवं” अशा भावपूर्ण शब्दांत रसिकांना आध्यात्मिक वातावरणात नेलं.
यानंतर कबीरा मान जा, कैसी तेरी खुदगर्जी, सासुराल गेंदा फूल, या चिमण्यांनो अशा गाण्यांनी त्यांनी मैफलीत जादुई रंग भरले.
त्यानंतर मंचावर आलेल्या विशाल भारद्वाज यांचे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. “नागपूरचे लोक मनाने सुंदर आणि संगीतासाठी अतिशय समजूतदार आहेत” असे सांगत त्यांनीही पहली बार मोहब्बत की है, थोडे भिगे भिगे, थोडे नम है हम अशी मनात घर करणारी गीते सादर केली.
आपल्या प्रवासातील आठवणी सांगताना विशाल म्हणाले,माचिस हा माझा पहिला चित्रपट. लता दीदींसोबत पहिल्यांदा काम करताना मी खूप घाबरलो होतो. त्या म्हणाल्या, ‘मी लता मंगेशकर आहे हे विसरा.’ आणि मग आम्ही ‘पानी पानी रे’ रेकॉर्ड केले. या आठवणीवर सभागृहात कडकडाटी टाळ्या वाजल्या.
ट्रान्सजेंडर कलाकारांची भावपूर्ण प्रस्तुती-
ममत्व फाउंडेशनच्या शिवमुद्रा डान्स ग्रुपने सादर केलेला पौराणिक कथांचा नृत्यप्रयोग विशेष आकर्षण ठरला.
अर्धनारीनटेश्वर, द्रौपदी वस्त्रहरण, श्रीकृष्ण रासलीलेतील गोपेश्वराचे नृत्य, माँ यल्लमाचा जोगवा अशा दृष्यांनी रसिक भारावले.
कलाकारांसह कोरिओग्राफर जय, सूत्रसंचालिका स्वरा करंजगावकर आणि संस्थाध्यक्षा श्रद्धा जोशी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी यांसह सर्व सदस्यांचे विशेष योगदान लाभले.




