🔹कळमेश्वर तालुक्यात शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर
🔹राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचीत राहणार नाही
नागपूर समाचार : गत पन्नास वर्षात शेतकऱ्यांचे पावसामुळे जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या पावसाने झाले आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भाग उध्वस्त झाले आहेत. राज्याच्या प्रत्येक भागात शासन शेताच्या बांधावर जावून पंचनामे करीत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळप्रसंगी ड्रोनच्या सहाय्याने व याचबरोबर प्रत्यक्ष पंचनाम्याच्या माध्यमातून अधिकाधिक मदत केली जाईल, असे सांगितले आहे. आम्ही वेळप्रसंगी निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करू असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात असलेल्या मौजा दाढेरा, तिडंगी, तेलगाव, नांदा गोमुख व जिल्ह्यातील इतर गावांतील कृषी क्षेत्राची त्यांनी पाहणी केली. या गावातील संत्रा, सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला-वेलवर्गीय पिके उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर भेटून पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी धीर दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शासकीय यंत्रणेत पंचनाम्याप्रमाणे शेतकऱ्यापर्यंत मदत पोहचविली जाते. पंचनामे करतांना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले आहेत. या पंचनाम्यामध्ये काही चूक असल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यात योग्य ती दुरुस्ती केली जाईल. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांवर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यात ऑगस्ट अखेरपर्यंत सूमारे 25 लाख व सप्टेंबर महिन्यात 22 लाख हेक्टर एवढे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. राज्यातील सर्व महसूल यंत्रणा शेताच्या बांधावर असून येत्या 5 ऑक्टोबर पर्यंत झालेल्या नुकसानीची आकडेवारी येईल. यानंतर मंत्री मंडळस्तरावर व्यापक विचार विनिमय करुन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आज शहरांमध्ये सिमेंटचे रस्ते झाल्याने शहरामध्ये पाणी साचते आहे. यादृष्टीने विचार करुन शहरात जल निस्सारण व मल निस्सारण आणि ग्रामीण भागामध्ये जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून मातीची धूप कमी व्हावी, पूराचा धोका कमी व्हावा यावर भर देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.




