- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर (कामठी) समाचार : कामठीला स्वच्छ व सुंदर शहरात रुपांतरीत करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

🔹कामठी येथील जयस्तंभ चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचे शानदार उद्घाटन

नागपूर (कामठी) समाचार : नागपुरच्या विकासासमवेत परिसरातील गावांचाही विकास झाला पाहिजे याकडे आम्ही सुरुवातीपासून कटाक्षाने लक्ष दिले. मेट्रोचा विस्तार करतांना कामठीसह कन्हानपर्यंत मेट्रो धावेल याचे नियोजन आपण केले आहे. कामठीतून जाणाऱ्या मेट्रोच्या महामार्गाखालील रस्त्यांचे रुंदीकरण न करता हा मार्ग चारपदरी व्हावा अशी आमची इच्छा आहे. यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आम्ही उपलब्ध करुन देत असल्याचे सूतोवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

कामठी येथील जयस्तंभ चौकातील रेल्वे उड्डाण पुलाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी व वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणतेही नगर स्वच्छ व सुंदर ठेवायचे असेल तर तेथील प्रशासनासह नागरिकांचाही तत्पर सहभाग आवश्यक असतो. वाढत्या अतिक्रमणामुळे कामठी शहराला मुक्त करावयाचे असल्यास अतिक्रमणाचा विळखा बाजुला करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे. अतिक्रमणामुळे जे रस्ते बाधीत झाले आहेत त्या रस्त्यावरील दुकानदारांचा रोजगार हिरावला जाणार नाही याला सर्वोच्च प्राधान्य देऊन मेट्रो स्टेशन व महसूलच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या मॉलमध्ये त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. या शहराला चोविस तास पाण्याची व्यवस्था करता येईल असे ते म्हणाले. यात गरिबांसाठी विशेष सवलतीचे दर तर व्यावसायिक क्षेत्रासाठी वेगळे दर आखून ही योजना सक्षमपणे सुरु ठेवता येणे शक्य होईल असे त्यांनी सांगितले.

पुर्वी नागपूर ते भंडारा रोडवर मोठ्या प्रमाणात अपघात व्हायचे आजही रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे. या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीला दूर करण्यासाठी मोठ्या उड्डाण पुलाची गरज आहे. हे लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणी केल्याप्रमाणे जवळपास 1600 कोटी रुपये खर्चून नागपूर ते भंडारा हा सहापदरी मार्ग हाती घेत आहोत. याचे भुमिपूजन येत्या पाच महिन्यात करु असे त्यांनी सांगितले. याचबरोबर झिरो माईल ते ऑटोमोटिव्ह चौक पर्यंत दिडशे कोटी रुपयांचा सिमेंट रोड मंजूर केला आहे. येथे वरतून पुल आणि खाली दुहेरी रस्ता अशी सोय होणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.

पुर्वी रामटेकला कृषी क्षेत्रासाठी पाण्याचा प्रश्न व्हायचा म्हणून मोर्चे यायचे आता तोतलाडोह पूर्ण भरले आहे. खिंडसी तलाव व रामटेक हे दोन्ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे झाले आहे. खिंडसी तलावातून विमानाचे उड्डाण सहज शक्य आहे. रामटेकच्या विकासाच्या दृष्टीने वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी पुढाकार घेतल्यास त्यालाही आमचे सहकार्य राहील, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.

1997 पासून कामठीच्या विकासासाठी आमची कटिबध्दता – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

1997 ला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मला संधी मिळाली. गडकरी साहेबांमुळे मिळालेल्या या संधीमुळे कामठी, कोराडी व पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी, येथील सर्व सामान्य जनतेच्या विकासासाठी मी तेव्हा पासून कटिबध्द आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला मोठे करण्याचे व्हिजन गडकरी साहेबांनी सदैव बाळगले असून या क्षेत्राच्या विकासासाठीही तेवढीच कटिबध्दता जपल्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनुकळे यांनी सांगितले.

नागपुरच्या चौफेर विकासासह राष्ट्रीय पातळीवरील अकरा मोठ्या इंस्टीटयुट नागपूर मध्ये आल्या आहेत. मिहान प्रकल्पातून सूमारे दिड लाख रोजगार निर्मिती झाली आहे. दहेगाव, खापरखेडा, कामठी व इतर ग्रामीण भागात रस्त्याची सुविधा भक्कम व्हावी यादृष्टीने सूमारे 234 किलोमीटरचे मार्ग गडकरी साहेबांनी आपल्याला दिले. जगातील सर्वात लांब डबलडेकर पुल कामठीला आपण दिला. येथे मेट्रो मिळाली. यातून साधल्या जाणाऱ्या विकासातून एक नवे बळ या भागातील नागरिकांना मिळाले असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

रस्त्याच्या अतिक्रमणात जाणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला आम्ही मेट्रोच्या ठिकाणी विकसीत केल्या जाणाऱ्या मॉलमध्ये प्राधान्याने जागा देऊ, असे त्यांनी सांगितले. गरिबांना सोबत घेतल्याशिवाय विकासाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आपण येथे 6 हजार 330 पट्टेधारकांची यादी केली आहे. यातील तीन हजार लोकांना आजवर पट्टयांचे वाटप झाले आहे. लवकरच उर्वरित लोकांनाही पट्टयाचे वाटप केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

विदेशात गेल्यावर एखाद्या शहराकडे पाहून आपल्याला हेवा वाटावा तसे परिवर्तन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. आपण आपले काम करीत रहावे हे गडकरी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. लोकप्रतिनिधी हे विकासाचे प्रतिक असतात याचा आदर्श वस्तुपाठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घालून दिला असल्याचे वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

यावेळी सुलेखाताई कुंभारे यांनी मनोगत व्यक्त केले. रेणुका देशकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.