सुंदर गाव पुरस्कार देऊन सरपंचा शिला नितेश वांगे व ग्रामसेविका अंकिता चकोले यांचा सत्कार, जनतेच्या पाठबळामुळे आपल्याला पुरस्कार : सरपंचा शीला वांगे
नागपुर समाचार : सरपंच झाल्यावर आपल्या गावाचा विकास कसा करावा, जनतेनी दिलेला कौल आपल्याला पाच वर्ष मान्य राहील, हेच बिद्र डोळ्यासमोर ठेवत गावकऱ्यांच्या सहकार्याने गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत ही महत्त्वाची कडी आहे. शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी व योग्य वापर करून गावाला आदर्श गाव बनविता येतो. असा आदर्श तालुक्यातील पावडदौना या ग्रामपंचायतीने निर्माण केला आहे. याची दखल घेत जिल्हा परिषदेतर्फे आयोजित “आर.आर.आबा पाटील सुंदर गाव” पुरस्कार वितरण सोहळ्यात पावडदौना ग्रामपंचायतीला तालुका सुंदर ग्रामपंचायत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारात दहा लाख रुपयांच्या धनादेश प्रधान करण्यात आला.
मौदा तालुक्यातील पावडदौना ग्रामपंचायतला राज्य शासनाचा आर. आर. आबा पाटील सुंदर गाव तालुका स्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. नागपूरच्या रेशीम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात हा भव्य सोहळा पार पडला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर कार्यक्रमाचे, उद्घाटक राज्यमंत्री वित्त व नियोजन, आमदार ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ.आशिष देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनायक महामुनी, माजी आमदार टेकचंद सावरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, शिवसेना मौदा तालुकाप्रमुख नितेश वांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र व राज्य पुरस्कृत अनेक योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्याचा 100% प्रयत्न असतो. ग्रा प कर आकारणी व विविध अभिलेख, संगणकीय दाखले याबद्दल विशेष काळजी घेतली जाते. दरवर्षी लेखापरीक्षण होते, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व म्हणून पुस्तकांची उपलब्धता, प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ यासाठी सदस्य प्रयत्न करतात. आमदार व खासदार निधीतील कामे दर्जेदार करून घेण्याचा प्रयत्न असतो. यासाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांचेही सहकार्य वेळोवेळी लाभते. म्हणून अशा पुरस्कारापर्यंत पोहोचता येते. सदर पुरस्कारासाठी तालुक्यातील पावडदौना या ग्रामपंचायती निवड झाल्याबद्दल ग्रा प पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याबाबत सरपंच शीला वांगे यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की जनतेच्या पाठबळामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळाला व त्यापुढे म्हणाले की,
प्रत्येक ग्रामविकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशाने सर्वांना बरोबर घेऊन आपण पावडदौना या गावच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि करत आहोत. गाव विकासाला चालना देण्यासाठी व त्या माध्यमातून गावातील प्रत्येक अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे लागते, हा पुरस्कार सन्मान माझ्या एकटीचा नसून संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायत अंतर्गत पावडदौना, वांजरा, मोहखेडी येथील मायबाप जनतेचा असून हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करते. पुढेही
प्रत्येक ग्रामस्थाने यात सहभाग घेतल्यास गावांचा चेहरामोहरा बदलून शाश्वत विकास साध्य होईल. हा पुरस्कार खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे दूरदृष्टीपूर्ण पाऊल ठरेल.