नागपूर समाचार : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली 11 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सिव्हिल लाईन येथील पोलीस भवन येथे “69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन” निमित्त विविध विभागातील अधिकारी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था तसेच दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, नागलोक आदी ठिकाणांचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली.
ही बैठक 2 ऑक्टोबर 2025 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन, विजयादशमी (दसरा) या दिवशी दीक्षाभूमी येथे देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली होती. बैठकीचा उद्देश सर्व विभागांमध्ये समन्वय साधणे आणि तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये हा होता.
पोलीस आयुक्तांनी बैठकीत सांगितले की दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, नागलोक या ठिकाणी लाखो लोक भेट देणार असल्याने सर्व संस्थांनी अधिकृत समाजमाध्यमांद्वारे माहितीचा प्रसार करावा, ज्यामुळे अनुयायांना गैरसोय होणार नाही. वाहतूक नियमन, गर्दी व्यवस्थापन, पावसामुळे होणाऱ्या अडचणींची तयारी, अन्न स्टॉलवरील सुरक्षितता, रॅलींचे पूर्वनियोजित मार्ग, बस व रेल्वे प्रवास सुलभ करण्यासाठी अनाउन्समेंट सिस्टीम, नियंत्रण कक्ष, वेगळे एन्ट्री-एक्झिट पॉईंट, मिसिंग कक्ष, रॅम्प व इमर्जन्सी गेट या सर्व गोष्टींचा समावेश नियोजनात करण्यात आला आहे.
बैठकीत विनापरवाना होर्डिंग्जवर बंदी, फक्त धार्मिक होर्डिंग्जना परवानगी, भोजनदानामुळे होणारी गर्दी टाळणे, वाहन पार्किंग नियमांची अंमलबजावणी, तसेच अतिरिक्त CCTV कॅमेरे व स्क्रीन बसविण्याबाबत चर्चा झाली. यंदा 10 ते 15 टक्के अधिक अनुयायी येण्याची शक्यता असून 8 ते 10 लाख लोकांच्या उपस्थितीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मोबाईल नेटवर्क समस्या, बस स्टॉप, पार्किंग, नागलोक व ड्रॅगन पॅलेसचे व्यवस्थापन, ST बसची सोय व इतर मुद्द्यांवरही विचारविनिमय झाला.
बैठकीस जिल्हाधिकारी इटनकर, महानगरपालिकेचे डॉ. अभिजीत चौधरी, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, शिवाजी राठोड, राजेंद्र दाभाडे, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त बी. वैष्णवी, वसुमना पंत, मिलिंद मेश्राम, रवींद्र बुधांरे (कार्यकारी अभियंता), सतीश चौधरी (सहाय्यक आयुक्त), ड्रॅगन पॅलेस अध्यक्षा सुलेखा कुंभारे, जेल अधीक्षक वैभव आगे, रचना गजभिये (डीडीके नागपूर), रोशन (फूड RDA), डॉ. सुधीर फुलझले, डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे, भदंत नागदीपंकर (दीक्षाभूमी), समता सैनिक दलाचे राजकुमार वंजारी, नागलोकचे साहेबराव शिरसाट, NMRDA चे चिमुरकर, VNIT चे सोळंके, MSEDCL चे काकडे, संजय कुमार मोहरम (PWD इलेक्ट्रिकल), फायर NMC चे सुनील डोरले, ट्रान्सपोर्ट विभागाचे प्रवीण सरोदे, बजाज नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजय मानकर, वाहतूक विभागाचे प्रवीण पांडे, सोनेगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेळके यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.