विविध ठिकाणच्या शिबिरांमधून आतापर्यंत ६०६ युनिट रक्त संकलन
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेचे अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने मनपा आरोग्य विभागाद्वारे मंगळवारी २ सप्टेंबर रोजी मनपा मुख्यालयामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार उपस्थित होते. अर्पण रक्तपेढी च्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मनपा मुख्यालयामध्ये आयोजित रक्तदान शिबिरामधून ५७ युनिट रक्त संकलन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनावरून नागपूर शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखील रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण २६ मंडळांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यातून ५५० युनिट रक्त संकलन करण्यात आले. मंगळवार २ सप्टेंबर पर्यंत आयोजित रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण ६०६ युनिट रक्त संकलन झालेले आहे.
मनपा पॅनल मधील रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा येथील रक्तपेढी आणि शहरातील इतर खासगी रक्तपेढीच्या सहकार्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये रक्तदान शिबिर राबविण्यात येत आहेत. नागपूर शहरात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता हे रक्तदान शिबिर महत्वाचे ठरणार आहेत. गणेशोत्सव मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत मनपामध्ये बैठक देखील घेण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने मनपाच्या सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयामधून विविध रक्तपेढी च्या सहकार्यातून झोन स्तरावर गणेशोत्सव मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहेत.
मंगळवारी २ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये मनपा पुरस्कृत अर्पण व्हॉलंटरी रक्त केंद्र यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले.