पोलीस लाईन टाकळीसह तीन ठिकाणी विसर्जनाची खास व्यवस्था
नागपूर समाचार : शहरातील श्री गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक व भक्तीभावाने करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मनपाने यावर्षी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, व लकडगंज भागातील कच्छीविसा मैदानात विसर्जन कुंडांची सोय केली आहे. विशेष म्हणजे, सहा फूट व त्यापेक्षा मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा कृत्रिम तलाव सज्ज असून, हा कृत्रिम तलाव कोराडी कृत्रिम तलावापेक्षा मोठा आहे. येत्या ५ सप्टेंबरपासून येथे विसर्जनाला सुरुवात होणार आहे. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळानी या व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी केले आहे.
नागपूर शहरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान गणपतीच्या विसर्जनासाठी शेकडो गणपती मूर्ती कोराडी येथील तलावाकाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात नेण्यात येतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागपूर सावनेर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच गाड्यांकरिता लागणारे इंधन व व्यवस्थापन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च वाढतो. त्याकरिता नागपूर महानगरपालिका द्वारा नागपूर शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम जलाशय कुंडाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यानुसार, पोलिस लाईन टाकळी येथे ४ ते ६ फूट मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गोरेवाडा येथे ६ फूट व त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. लकडगंज येथील कच्छीविसा मैदान येथे ५ फूट पर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. तर गोरेवाडा व पोलिस लाईन टाकली येथे चार मोठ्या क्रेनची व्यवस्था असणार आहे. तसेच सर्वत्र विद्युत प्रकाश व्यवस्था असणार आहे.
असे आहे गोरेवाडा विसर्जन कुंड
गोरेवाडा येथील विसर्जन कुंडाला जाण्याकरिता बारा मीटरचा प्रशस्त रस्ता तसेच आकस्मिक सेवांकरिता पोच रस्ता आहे. हा विसर्जन कुंड 32 मीटर लांब व 18 मीटर रुंद व साडेसहा मीटर खोल आहे. यात मोठ्या मूर्तींचे विसर्जन सहजपणे होऊ शकेल, याची काळजी मनपा प्रशासनाने घेतली आहे. मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर वाहनांना विसर्जन स्थळाहून बाहेर निघण्याकरिता वेगळा रस्ता राहणार आहे. विसर्जनाकरिता येणाऱ्या भक्तांसाठी शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. व्यवस्थापनामध्ये मुख्य भूमिका असणाऱ्या पोलीस व महानगरपालिका येथील कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती खोल्या व देखरेख कक्ष तयार करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी पुरेशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विसर्जनानंतर गाळाची विल्हेवाट व पाण्याचे शुद्धीकरणासाठी पाणी प्रक्रिया सयंत्र लावण्यात येणार आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने परिसराला सुरक्षा भिंत तयार करण्यात आली आहे.




