नागपूरकरांच्या सहभागातून साधलेले सामूहिक यश
नागपूर समाचार : नागपूर शहर पोलीसांनी अमली पदार्थांविरोधात राबविलेल्या “ऑपरेशन थंडर” मोहिमेला अधिक गती व बळ देण्यासाठी दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता राजनगर येथील नॅशनल फायर कॉलेज येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांच्या शुभहस्ते “ऑपरेशन थंडर” श्वेतपत्रिकेचे अनावरण झाले.
नागपूरकरांसाठी हा एक प्रेरणादायी व अभिमानाचा क्षण ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सादर केले, ज्यांनी सांगितले की, नागपूरकरांच्या सक्रिय सहभागामुळेच “ऑपरेशन थंडर” मोहीम यशस्वी झाली आहे. मागील दीड वर्षांपासून या मोहिमेद्वारे अमली पदार्थांच्या मागणी व पुरवठ्यावर मोठा प्रहार करण्यात आला असून, १० कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली, ७०० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आणि ‘पीट-एनडीपीएस’ अंतर्गत महाराष्ट्रात प्रथमच नागपूर पोलिसांनी तीन यशस्वी कारवाया केल्या.
२० ते २६ जून दरम्यान “जागतिक अमली पदार्थविरोधी सप्ताह” साजरा करण्यात आला, ज्यामध्ये नाट्यप्रयोग, रॅली, विद्यार्थ्यांचा सहभाग, जनजागृती कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलीस १५ लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचले असून, भारतातील पहिली नॅशनल कॉन्फरन्स नागपूरमध्ये घेण्यात आली, ज्यात ३० विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या चर्चेचे फलित म्हणजे आज अनावरण करण्यात आलेली श्वेतपत्रिका, ज्यामध्ये आतापर्यंतच्या कामगिरीचा सविस्तर आढावा, पुढील दिशा आणि रणनीती स्पष्ट करण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर पडलेल्या १० तरुणांना ‘वॉरियर प्रमाणपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या भाषणात डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले की, “अमली पदार्थांचे व्यसन हे समाजाला पोखरणारे गंभीर संकट आहे. नागपूर शहर पोलिसांनी या मोहिमेद्वारे केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. ही मोहीम इतर राज्यांमध्येही राबविण्याची गरज आहे.”
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “‘ऑपरेशन थंडर’ हे फक्त पोलीसांचे नसून नागपूरकरांच्या एकजुटीमुळे साध्य झालेले सामूहिक यश आहे.” त्यांनी सांगितले की, या मोहिमेद्वारे केवळ कायदेशीर कारवाई नाही तर व्यसनमुक्ती व पुनर्वसनालाही विशेष महत्त्व देण्यात आले असून, आज नागपूर शहर ड्रग्समुक्तीकडे वाटचाल करत आहे. कार्यक्रमाला एनसीसी, रिटायर्ड पोलीस अधिकारी, सायबर अँबेसिडर, सेवाभावी संस्था, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या प्रसंगी नवीनचंद्र रेड्डी, वसंत परदेशी, राजेंद्र दाभाडे, लोहित मतानी, निकेतन कदम, रश्मिता राव, डॉ. अश्विनी पाटील, शशीकांत सातव आणि राहुल माखणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन मेहक स्वामी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि पोलीस आयुक्त कार्यालयातील पीआरओ टीम यांनी विशेष परिश्रम घेतले. नागपूर पोलीसांनी या कार्यक्रमातील सहभागींसाठी QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली.