मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्तांना धनादेश
नागपूर समाचार : मिहान इंडिया लिमिटेड यांच्या सीएसआर निधीमधून नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत क्षयरोग विभागाला २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. बुधवारी (ता. २०) ‘रामगिरी’ मुख्यमंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिहान इंडिया लिमीटेडकडून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय नागपूरचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रवि चव्हाण, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक एम.ए. आबिद रुही, कंपनी सेक्रेटरी तथा मुख्य लेखा अधिकारी कुमार रंजन ठाकूर, लेखा व वित्त व्यवस्थापक प्रज्ञेश म्हैसकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगर पालिकेसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) ला ४५ लाख ४३ हजार ९३६ रुपये, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) ला ३० लाख आणि वुमेन एज्युकेशन सोसायटीला (एलएडी महाविद्यालय) २४ लाख ९३ हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मनपाला मिहान इंडिया लिमिटेड कडून प्राप्त सीएसआर निधीचा उपयोग क्षयरोग विभागामध्ये सुविधा आणि क्षय रुग्णांकरिता केले जाणार आहे.
प्राप्त २५ लाख रुपयांपैकी २१ लाख ५६ हजार रुपये किंमतीची १००० चाचणी किटसह ४ मॉड्यूल असलेली टूनेंट मशीन खरेदी केली जाणार आहे. क्षयरोग निदान लवकरात लवकर करण्यासाठी या मशिनचा उपयोग होणार आहे. याशिवाय उर्वरित ३ लाख ४४ हजार रुपये निधी ११५ क्षयरुग्णांना ६ महिन्यांसाठी दत्तक घेण्यासाठी वापरला जाईल. या निधीमधून क्षयरुग्णांना आवश्यक ती मदत करून त्यांची काळजी घेतली जाईल.