नागपूर समाचार : प्रहार मिल्ट्री स्कूल, रवी नगर येथे “राखी अर्पण कार्यक्रम” अत्यंत उत्साहात, देशभक्तीने भारलेल्या आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. देशाच्या सीमांवर सजग असलेल्या वीर जवानांना प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचे अर्पण केले. या अनोख्या उपक्रमाने रक्षाबंधनाच्या सणाला एक राष्ट्रीय आणि संवेदनशील परिमाण प्राप्त करून दिले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल चेतन आनंद (उप. विंग कमांडर, ए.पी.एस. विंग, जी.आर.सी.), तसेच सी.पी. अँड बेरार एज्युकेशन अंतर्गत येणार्या एमबीए डिपार्टमेंटचे शरदचंद्र भावे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांच्याकडे नागपूरमधील तसेच प्रहार मिल्ट्री स्कूल, रवीनगर यांच्यासह एकूण २५ शाळांमधून संकलित झालेल्या तब्बल सव्वा लाख राख्यांचे औपचारिक सुपूर्दग्रहण करण्यात आले. या राख्या सीमेवर तैनात जवानांना पाठवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहुण्यांना राखी बांधून आपले प्रेम आणि सन्मान व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन आणि ‘अमर जवान’ स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांचे मनोवेधक सादरीकरण केले, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात राष्ट्रप्रेमाचा जाज्वल्य संचार झाला. या भावस्पर्शी सोहळ्याला सी.पी.अँड बेरार सोसायटीअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षकगण व प्रहार मिल्ट्री स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. यावेळी लेफ्टनंट कर्नल चेतन आनंद यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले,
“आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी आपल्या सशस्त्र दलांप्रती असलेली आत्मीयता आणि आदरभाव पाहून आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. ‘राखी’ ही केवळ नाती जपणारी नाही, तर शौर्य, समर्पण आणि एकतेचे प्रतीक ठरू शकते, हे या उपक्रमाने अधोरेखित केले आहे.”
त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांच्यात देशसेवा आणि समाजभान जपण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सांगता प्रसंगी मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ देशभक्ती नाही, तर सैनिकांच्या त्यागाविषयी जाणीव निर्माण झाली आहे. ही राखी त्यांच्या भावना पोहोचवणारे अमूल्य माध्यम ठरेल.” कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका मृणाल काटे यांनी केले.समारोप राष्ट्रीय गीताने करण्यात आला, ज्याने उपस्थित सर्वांच्या मनामध्ये अभिमान, आदर आणि देशसेवेची प्रेरणा जागवली. शाळेच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत सांगितले की “राखी अर्पण” हा एक उपक्रम नसून, तो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशासाठी समर्पणाची ज्योत प्रज्वलित करणारा, संवेदनशीलता, ऐक्य आणि राष्ट्रीयत्वाचा सजीव अनुभव ठरला.