नागपूर वन विभाग, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात 3 हजार 150 कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी
गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये सायरन
राज्य सरकारचा ‘मार्वल’ कंपनी समवेत सामंजस्य करार
नागपूर समाचार : विदर्भातील नागपूर वनविभाग, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने यावर उपाययोजनेसाठी मार्वलमार्फत एक विशेष सामंजस्य करारावर आज नागपूर येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत मार्वलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार व व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कराराचे आदानप्रदान केले. कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करुन अपघाताचे, गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
नागपूर वन विभाग, पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी
या करारांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या भोवताली असलेल्या गावाच्या सीमेवर एकूण 3 हजार 150 कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारलेले हे कॅमेरे लावण्यात येतील. गावाच्या दाट वस्तीच्या ठिकाणी सायरन उभारुन ते वायरलेसद्वारे या कॅमेरांशी जोडले जातील. वाघ,बिबट्या यांना स्वतंत्र ओळखतील असे तंत्रज्ञान या कॅमेऱ्यात असणार आहे. वाघ अथवा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्याबरोबर गावामध्ये याकॅमेऱ्याशी जोडलेले सायरन गावकऱ्यांना सावध करतील.
करारानुसार पेंच व्याघ्र प्रकल्पात 875, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 525, नवेगाव व्याघ्र प्रकल्पात 600 तर नागपूर वनक्षेत्रात 1 हजार 145 हे कॅमेरे व सायरन जोडले जातील.
नागपूर विभागात वरचेवर वाढणारे वाघांचे हल्ले लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यापूर्वी विविध आढावा बैठकीमध्ये या बाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. वाघांचे हल्ले शाश्वतरित्या थांबवता यावेत व यात होणारी मनुष्यहानी टाळता यावी यादृष्टीने कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करु असे त्यांनी सांगितले होते. याबाबत राज्याचे वनमंत्री यांच्या समवेत एक व्यापक बैठक घेऊन या कराराबाबत निर्णय घेण्यात आला होता. संपूर्ण नियोजनानंतर आज या करारावर स्वाक्षऱ्या करुन लवकर हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनविभाग व मार्वल कंपनीला दिले.
यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डॉ. किशोर मानकर, क्षेत्र संचालक डॉ.प्रभुनाथ शुक्ल, आर. जयराम गौडा, उपवन संरक्षकविनीत व्यास, उपसंचालक अक्षय गजभिये, सहाय्यक वनसंरक्षक पुजा लिंबगावकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.