नागपूर समाचार : कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पातून उपलब्ध होणारी कोळशाची राख ही खसारा, कोराडी, वारेगाव व नांदगाव येथील बंधाऱ्यात पोहचविली जाते. ही राख वीट उद्योगासह विविध ठिकाणच्या विविध भरावासाठी उत्तम पध्दतीने वापरता येते. या राखेला शासकीय पातळीवर कोणतेही मूल्य आकारले जाणार नसून कोणत्याही उद्योजकाला ही राख आता विनामूल्य उपलब्ध करुन दिल्या जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता विलास मोटघरे, खापरखेडाचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोराडी औषणिक वीज केंद्रातुन दररोज बारा हजार मेट्रिक टन तर खापरखेडा येथून दररोज सात हजार मेट्रिक टन राख उपलब्ध होते. या राखेचा उपयोग चांगल्या कारणासाठी व्हावा यादृष्टीने औष्णिक विद्युत प्रकल्प व जिल्हा प्रशासनामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. कोणत्याही शासकीय व निमशासकीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी ही राख उपयोगात यावी यासाठी त्या-त्या कार्यालयांना 125 रू प्रति टन वाहतुक खर्च दिला जाईल हे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
नागपूर व परिसरातील राख आधारित उद्योग, स्टोन क्वेरी माईन्स, लेआउट भरणा, बांधकाम व्यावसायिक, तसेचं लघुउद्योग (जसे की वीटभट्टी, सिमेंट पाईप, पेवर ब्लॉक उद्योग इत्यादी) यांना संचित राख बंधाऱ्यातून विनामूल्य राख प्रदान केली जाणार आहे.
ही राख महानिर्मिती व पर्यावरण विभागाचे नियम, अधिनियम, शर्ती व अटी यांच्याअंतर्गत उपलब्ध करून दिली जाईल असे बैठकीत सांगण्यात आले. कोराडी व खसारा, वारेगाव राख बंधाऱ्यात मुबलक प्रमाणात राख उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संबंधितांनी कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या राख उपयोगिता विभागातील संपर्क अधिकारी यांच्या समवेत संपर्क साधावा.
कार्यकारी अभियंता प्रवीण मडावी यांना 8411957872, तर खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे कार्यकारी अभियंता पंकज धारस्कर यांना 9923585481 या मोबाईलवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.