नागपूर समाचार : केंद्रीय गृह मंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांची 26 मे 2025 रोजीची नागपूर भेट व दरम्यान आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारी संदर्भात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज आढावा घेतला.
श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी,पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आयोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे 25 मे रोजी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार आहे. श्री. शाह यांच्या हस्ते 26 मे रोजी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे ‘स्वस्ति निवास’ भूमिपूजन आणि चिचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी व यासाठी शासकीय यंत्रणा तथा आयोजक संस्था यांच्या तयारीचा आढावा घेवून श्रीमती बिदरी यांनी यावेळी आवश्यक सूचना दिल्या.