नागपूर/कोराडी समाचार : जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला, कुटुंबाला किंवा समाजाला अडचणीत असताना मदतीचा हात दिला जातो, तेव्हा लोकप्रतिनिधीचा खरा धर्म पूर्ण होतो. खरं समाधान लोकसेवेतच आहे. ही लोकसेवा माझ्याकडून निरंतर अशीच घडत राहो. आजही घडली. दीपाली सावरकर या माऊलीच्या हातात ई-रिक्षाची चावी देऊन. नागपूरच्या हुडकेश्वर बायपास भागात दीपाली ताई एका छोटश्या झोपडीत राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे दुर्देवी निधन झाले. तेव्हापासून त्या काबाडकष्ट करून दोन मुलांना घेऊन हलाखीचे जीवन जगत आहे.
काल ही माऊली कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात मला भेटायला आली. यावेळी तिने तिची कैफियत सांगून संसाराचा गाढा पुढे हाकण्यासाठी ई-रिक्षाची देण्याची विनंती केली. मी लागलीच माझ्या कर्मचाऱ्यांना सांगून या ताईला शासकीय योजनेतून ई-रिक्षा देण्याचे आदेश दिले. आज दुपारी त्यांना बोलावून त्यांच्या हातात ई-रिक्षाची चावी ठेवली. यावेळी या माऊलीला अश्रू अनावर झाले. तिला धीर देत माहिती घेतली तेव्हा तिला इयत्ता दहावीत शिकत असलेली हस्तिका ही मुलगी आणि इयत्ता पाचवीत असलेला यज्ञेश हा मुलगा असल्याचे कळले. त्यामुळे लगेच तिच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. जोपर्यंत आणि जे शिक्षण त्यांना घ्यायचे असेल त्याची जबाबदारी मी स्वतः उचलली.
त्यावेळी त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर समाधान होते. हेच समाधान मला माझ्या सेवेचे खरे पारितोषिक वाटले. जेव्हा लोकप्रतिनिधी कोणाच्या मदतीला धावून जातो, तेव्हा तो केवळ एक नेता नसतो, तर एक सेवक, एक मार्गदर्शक आणि समाजाचा विश्वासू आधार असतो. याच विश्वासू आधारातून माझ्याकडून अशीच समाजसेवा घडत राहो, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना!