जळगाव समाचार : पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून देशात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूनीवर निमलष्करी दलातील रजेवर गेलेल्या जवानांना तत्काळ सैन्य दलाच्या मुख्यालय येथे येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. यातच देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील हा कर्तव्यावर रवाना झाला आहे.
खेडगाव येथील मनोज पाटील सन २०१७ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. त्यांचा नाचणखेडे (ता. पाचोरा) येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी ५ रोजी विवाह झाला. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते. मात्र देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना त्वरित बोलावणे आले आहे.
त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक ८ रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला. लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेले मनोज पाटील हे हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी गुरुवारी सीमेवर रवाना होत आहे.
कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागत असल्याने माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिली आहे.