■ नागरिकांच्या तक्रारींवर थेट उद्यानातच अधिकाऱ्यांशी चर्चा; तातडीने उपाययोजनांचे आदेश
नागपूर समाचार : दत्तात्रय नगर येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची दयनीय अवस्था आणि त्यासंदर्भात वाढलेल्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, विधान परिषदेचे मुख्य प्रतोद तथा आमदार अभिजित वंजारी यांनी रविवारी (ता. ४ मे) सकाळी थेट उद्यानात भेट देऊन नागरिकांसमक्ष अधिकाऱ्यांशी खुली चर्चा केली.
या भेटीदरम्यान नागपूर महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार देखील उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी उद्यानातील देखभाल, स्वच्छता, खेळण्यांची तुटलेली स्थिती, खराब झालेली बसण्याची व्यवस्था, तसेच सुरक्षा यांसारख्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले.
या तक्रारी गांभीर्याने घेत आमदार वंजारी यांनी उद्यान अधीक्षकांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या विश्रांतीसाठी, लहान मुलांच्या खेळासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्यासाठी उद्यान एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याची योग्य देखभाल आवश्यक असून, जेथे गरज आहे तेथे नूतनीकरण करणेही अत्यावश्यक आहे, असे त्यांनी चर्चेदरम्यान सांगितले.
यावेळी परिसरातील अनेक नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, महिला प्रतिनिधी, तरुण मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सूचनाही आमदार वंजारी यांनी शांतपणे ऐकून घेतल्या व योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
दत्तात्रय नगर येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात नागरिकांच्या वतीने उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार यांचेसोबत चर्चा करताना आमदार अभिजित वंजारी.