■ नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली सभेत व्यक्त केल्या भावना
नागपूर समाचार : स्व. योगानंदजी काळे यांनी कार्यकर्त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपले. कठोर भाषेत बोलतानाही कुणाचे मन दुखावणार नाही, याची काळजी घेतली. ग्रामीण भागातही अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांनी प्रतिकुल काळातही कार्यकर्त्यांचे पालकत्व घेतले होते, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तसेच ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. योगानंदजी काळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय जनता पक्ष नागपूर महानगर शाखेच्या वतीने लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मीबाई लॉन येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. यावेळी स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय सहसंयोजक अश्विनीकुमार महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुलजी मोघे, स्व. योगानंदजी काळे यांच्या पत्नी उज्ज्वला काळे, मुलगा आशीष व मुलगी आदिती यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
निःस्पृह, निःस्वार्थ कार्य करताना योगानंदजींनी स्वतःसाठी कधीही काही मागितले नाही, याचा ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘योगानंदजी काळे यांचे व्यक्तित्व शालीन आणि नम्र होते. कार्यकर्त्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. संघटना आणि विचारांबद्दल त्यांची कटिबद्धता होती. त्यांच्या सहवासात मोकळेपणाने बोलण्याची, कार्यकर्त्यांना आपले सुख-दुःख मांडण्याची मोकळीक होती. त्यामुळे त्यांचे जाणे सर्वांसाठी एक मोठा आघात आहे.’ योगानंदजींनी जनसंघ, भाजप, स्वदेशी विचार मंच, विद्यापीठ तसेच विविध संघटनांमध्ये जे कार्य केले, ते कधीही विसरता येण्यासारखे नाही, असेही ते म्हणाले.
योगानंदजींचा कुणाशी वाद झाला, संघर्ष झाला किंवा मतभेद झाले, असे एकही उदाहरण नाही. किंबहुना सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती त्यांच्या व्यवहारात होती. त्यांनी ज्या काळात पक्ष संघटनेचे काम केले, तो कठीण काळ होता. त्या काळात मान, सन्मान, प्रतिष्ठा नव्हती. सुमतीताईंना आपण निवडणूक जिंकवून देऊ शकलो नाही, याचे शल्य त्यांच्या मनात होते. आपला पक्ष मोठा झाला पाहिजे, मोठे यश मिळाले पाहिजे, अशी उत्कट भावना त्यांच्या मनात होती, याचाही त्यांनी उल्लेख केला.
१९९५ च्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. त्यानंतर नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषदेत सत्ता होती. सर्व आमदार आपल्या पक्षाचे होते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान होते. ते नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरू झाले, तेव्हा मी पालकमंत्री होतो. त्यावेळी डॉ. पी. सी. अलेक्झांडर महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ‘योगानंद काळे यांची प्र-कुलगुरू पदासाठी शिफारस करणार असाल तर मी स्विकृती द्यायला तयार आहे,’ हे राज्यपालांचे शब्द होते, अशी आठवणही ना. श्री. गडकरी यांनी सांगितली.
स्व. योगानंदजी काळे हे प्रतिकुल काळात पक्षासाठी कार्य करणारा शेवटचा दुवा होते. आता बोटावर मोजण्याएवढे लोक उरले आहेत. कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करून दिशा देणाऱ्या दीपस्तंभासारखे ते उभे होते. त्यांची पोकळी भरून काढणारे असंख्य कार्यकर्ते तयार झाले तर, तीच त्यांच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.