
▪️ श्री संत गजानन महाराज पतसंस्थेतर्फे ‘मोगरा फुलला’चे आयोजन
नागपूर समाचार : श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित समर्पण पुरस्कार सोहळा आणि ‘मोगरा फुलला’ या भक्तीगीतांच्या मैफलीत भक्ती अन् समर्पणाचा अनोखा मिलाफ नागपूरकरांनी अनुभवला.
श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला समृद्धी सहकारी बँकेच्या अध्यक्ष व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता कांचनताई गडकरी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर आमदार श्री. मोहन मते, गजानन प्रसाद ग्रामीण उत्कर्ष शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष इंदुताई मोंढे, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे सचिव राहुल जवादे, विश्व वारकरी सेवा संस्थेचे संदीप कोहळे, शिवसेना शहर प्रमुख दीपक कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक स्व. गोविंदरावजी मोंढे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ‘समर्पण पुरस्कार’ यंदा जीवन आश्रय सेवा संस्थेला देण्यात आला. संस्थेच्या वतीने अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाचे उत्तम संचालन होत आहे. संस्थेचे प्रमुख श्री. विकास शेंडे यांना सौ. कांचनताई गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष होते.
पुरस्कार सोहळ्यानंतर सुप्रसिद्ध व्याख्याते व प्रबोधनकार श्री. गणेश शिंदे व सुप्रसिद्ध गायिका सौ. सन्मिता धापटे-शिंदे तसेच सहकलावंतांनी ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमातून भक्तीमय वातावरण निर्माण केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित या कार्यक्रमात व्याख्याते गणेश शिंदे यांनी माऊलींच्या जीवनातील प्रसंग श्रोत्यांच्या समोर मांडलेत. हे प्रसंग प्रेक्षकांपुढे उभे होत असताना त्याला सौ. सन्मिता धापटे-शिंदे यांच्या स्वरांमधील सुमधूर भक्तिगीतांची साथ मिळाली. श्री संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्रासह ज्ञानेश्वरीची उकल त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. हे विवेचन ऐकताना सभागृहात उपस्थित श्रोते तल्लीन झाले होते.
तत्पूर्वी, सौ. कांचनताई गडकरी यांनी स्व. गोविंदरावजी मोंढे यांनी सुरू केलेले कार्य एवढ्या मोठ्या स्तरावर पोहोचल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच संस्थेचं रोपटं वटवृक्षाएवढं मोठं झाल्याबद्दल अभिनंदन केले. श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंसस्थेचे अध्यक्ष अॅड. स्वप्नील गोविंदराव मोंढे यांनी प्रास्ताविकातून समर्पण पुरस्कारामागची भूमिका मांडली तर आभार प्रदर्शन परमानंद लोणारे यांनी केले.