- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार

नागपुर : रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता होणार नाही : अति. आयुक्त जलज शर्मा

नागपूर : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात सगळीकडून ऑक्सिजनची सर्वात जास्त मागणी येत आहे. नागपूरात सध्या खाजगी रुग्णालयात १३७७ बेडस् आणि शासकीय रुग्णालयात १४५० बेडस् उपलब्ध आहेत. कोव्‍हिड आणि नॉन कोव्हिड रुग्णांसाठी ४२०० जम्बो सिलेंडरची मागणी होत आहे. तसेच शहरात ४५०० जम्बो सिलेंडरचे उत्पादन होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.

 जलज शर्मा यांनी सांगितले की, नागपूरात सध्या ३ शासकीय, २ धर्मदाय आणि ३३ खाजगी रुग्णालय कोव्हिड रुग्णांना सेवा देत आहेत. लवकरच नवीन कोव्हिड रुग्णालयांची यामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे भविष्याची गरज लक्षात घेता ऑक्सिजनची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी मनपा काळजी घेत आहे.

 नागपुरात कोव्हिड टेस्टिंगच्या संख्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. अगोदर दररोज २००० ते २५०० पर्यंत टेस्टिंग होत होती. आता मनपा व खाजगी रुग्णालयांच्या माध्यमाने ६०००० पर्यंत टेस्टिंग होत आहे, असेही जलज शर्मा यांनी सांगितले.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात दररोज आरोग्य विभागाशी संबंधीत अधिका-यांची टिम डेथ ॲनॉलेसिस करीत आहे. तीन ते चार तास होणा-या या आढावा बैठकीत शहरातील मृत्यूची कारणे शोधली जात आहेत. मृतांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना रुग्ण अंतिम टप्प्यात रुग्णालयांमध्ये दाखल होतात. त्यापूर्वी ते कधी कोव्हिडची चाचणी सुद्धा करीत नाही. कोरोनाची लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा कोव्हिड चाचणी करून वेळेवर उपचार घेतल्यास त्यांचे प्राण वाचवू शकतात. नागरिकांनी मनपाच्या ५० चाचणी केंद्रांपैकी आपल्या नजीकच्या चाचणी केंद्रात सकाळी १० ते दुपारी २ चा सुमारास चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *