- Breaking News, नागपुर समाचार

लोकसभा चुनाव 2024 : सायंकाळी पाच वाजेपर्यंत नागपुरात सुमारे 48 तर रामटेकमध्ये 52 टक्के मतदान

ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह

◾नवमतदारापासून ज्येष्ठ नागरिकांचे मतदान

◾विशेष केंद्रांची निर्मिती ठरली मतदारांचे आकर्षण

लोकसभा चुनाव 2024 : लोकशाहीतील एक महत्वाचा उत्सव व नागरिक म्हणून आपल्या उत्तरदायित्वाची परीक्षा घेणा-या नागपूर आणि रामटेक निवडणुकीसाठीचे मतदान आज शांततेत पार पडले. नव मतदारांची संख्या वाढल्याने स्वाभाविकच याकडे भुवया उंचावल्या होत्या. नागपूर जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढू शकतील का, या प्रश्नाचे उत्तरही या निवडणुकीने दिले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ही सुमारे 48 टक्क्यांपर्यंत तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ही सुमारे 52 टक्क्यांवर विसावली.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी पाचनंतर मतदारांचे प्रमाण लक्षणीय दिसून आले. यामुळे काही मतदार केंद्रांवर सहापर्यंत आत असलेल्या परंतु मतदान न झालेल्या रांगेतील मतदारांना मतदान करण्यासाठी अनुमती देण्यात आली. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकेल.

जिल्हा प्रशासनामार्फत शहरात अनेक वैविध्यपूर्ण कल्पनांना अनुसरून मतदारांचा उत्साह वाढविण्यासाठी काही मतदान केंद्र साकारली होती. यात हँडलुम, बांबू, आदिवासी, क्रीडा, युवा व इतर केंद्रांनी लक्ष वेधून घेतले. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी विशेष वाहनासह व्हिलचेअरची व्यवस्था, तृतीयपंथीयांसाठी रेनबो थीमवर आधारित मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी या प्रातिनिधिक केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. यात युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बचत भवन सभागृह येथून नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील अतिसंवेदनशील केंद्र लक्षात घेऊन तेथील सीसीटीव्ही कॅमे-याचे सनियंत्रण केले गेले. यासाठी स्वतंत्र सॅाफ्टवेअर व संगणक तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली होती. निवडणूक निरीक्षक विपुल बन्सल यांनी स्वतः प्रत्येक विभागास भेट देऊन निरपेक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी यावर विशेष भर दिला.  

कडेकोट पोलिस बंदोबस्त

नागपूर तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघात पोलिस विभागाचा कडेकोट बंदोबस्त पहायला मिळाल्या. शहरी तसेच ग्रामीण भागात पोलिस मतदान केंद्रांवर पुरेशी पोलिस व्यवस्था तैनात असलेली पहायला मिळाली.  

दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था

दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. नागपूर तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. रामटेक, कन्हान, कामठी येथील केंद्रांवर या सुविधेचा वापर प्राधान्याने करण्यात आल्याचे पहायला मिळाले.

विशेष मतदान केंद्राची निर्मिती

लोकसभा निवडणुकीसाठी महिला, युवा आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची निर्मीती करण्यात आली. यासोबतच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या उत्कृष्ट थिम असणारे मतदान केंद्र मतदारांचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यात बांबू थीमवर आधारित आदिवासी प्रेरित मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. कट्टा, तालुका रामटेक येथे हे केंद्र होते. कट्टा आणि पंढराई ही दोन गावे मिळून या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांसाठी विशेषत्वाने इंद्रधनुष थिम मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.

4 जून रोजी होणार मतमोजणी

रामटेक आणि नागपूर लोकसभेसाठी 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूरसाठी 26 तर रामटेकसाठी 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *