- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : २१ जाहीरसभा अन् १३ लोकसंवाद यात्रा; नितीनजी गडकरींचा मतदारांशी ‘हार्ट टू हार्ट’ संवाद

पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नामवंतांतर्फेही प्रचार

नागपूर समाचार :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी अवघ्या १९ दिवसांमध्ये २१ जाहीर सभा, १३ लोकसंवाद यात्रा आणि बैठका व मेळाव्यांच्या माध्यमातून नागपूरकरांशी ‘हार्ट टू हार्ट’ संवाद साधला.

गेल्या दहा वर्षांपासून ना. श्री. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री असून त्यांनी नागपूरसह संपूर्ण देशात महामार्गांचे जाळे विणले. अनेक उड्डाणपूल व अशक्यप्राय वाटणारे भुयारी मार्ग निर्माण केले. आपल्या मतदारसंघासाठीही श्री. गडकरी यांनी भरीव कार्य केले असून नागपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम त्यांच्या हातून घडले. ते नागपूरला आपले कुटुंब मानतात आणि नागपूरकर जनतेचेही त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. यावेळी थेट गल्या व घरांपर्यंत पोहोचून ना. श्री. गडकरी यांनी नागपूरकरांचा आशीर्वाद घेतला व संवाद साधला. २७ मार्च २०२४ ला त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर ३० मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी अख्खे नागपूर पिंजून काढले. प्रत्येक मतदारसंघात दोन लोकसंवाद यात्रा झाल्या. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये एक लोकसंवाद यात्रा झाली. याशिवाय मान्यवरांच्या भेटी आणि मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व घटकाशी संवाद साधला. ३० मार्च ते १७ एप्रिल या कालावधीत ना. श्री. गडकरी २१ जाहीर सभांमध्ये सहभागी झाले. यात दक्षिण नागपूरच्या ६, मध्य व पश्चिमच्या ४, उत्तर नागपूरच्या ३ तर दक्षिण पश्चिम व पूर्वच्या २ सभांचा समावेश आहे. याशिवाय, उमरेड व काटोल येथे राजू पारवे, भंडारा-गोंदिया येथे सुनील मेंढे, गडचिरोली येथे अशोक नेते आणि चंद्रपूर येथे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी देखील ना. श्री. गडकरी यांच्या प्रचार सभा झाल्या. 

पंतप्रधान श्री. मोदी अन् मुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती

ना. श्री. नितीन गडकरी व रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ कन्हान येथे गेल्या १० एप्रिलला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची सभा झाली. याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी गडकरींच्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधील लोकसंवाद यात्रेत सहभाग घेतला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ना. श्री. गडकरी यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेतल्या.

ना. योगी आदित्यनाथ, मनोज तिवारी यांच्या जाहीर सभा

ना. श्री. नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ना. श्री. योगी आदित्यनाथ यांची शिवाजी चौक फ्रेन्ड्स कॉलनी येथे जाहीर सभा झाली. तर भाजपचे दिल्लीचे खासदार व प्रसिद्ध गायक-अभिनेते मनोज तिवारी देखील पश्चिम नागपुरातील गिट्टीखदान चौकात आयोजित सभेत सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *