- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

ताजबागमध्ये जाहीर सभेचे आयोजन

नागपूर समाचार :- नागपूरमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या विकासकामांचा सर्व जाती-धर्माच्या लोकांना लाभ झाला. कुण्या एका धर्मासाठी ही कामे होतात, असे नाही. त्यांचा लाभ सर्वांना होतो. नागपुरात उत्तम शैक्षणिक संस्था आल्या, मिहानमध्ये उद्योग आलेत. इतर धर्मांप्रमाणे मुस्लिम समाजाचे तरुणही त्याठिकाणी चांगले शिक्षण घेत आहेत, रोजगार मिळवत आहेत. यात आणखी भर पडावी आणि मुस्लिम समाजाची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती व्हावी, यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) येथे व्यक्त केला.

दक्षिण नागपुरात मोठा ताजबाग येथे ना. श्री. गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान, मोहसीन जाफर खान, साहेब खान, तन्वीर अहमद, मुस्तफा टोपीवाला, रशीद काझी, अश्रफ खान, इम्रान ताजी, मोबिन ताजी आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी ताजबागचा विकास करताना गरिबांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, ‘ताजबागचे उत्तम सौंदर्यीकरण झाले आहे. पण इथे आणखी काम होणे आवश्यक आहे. अलीकडेच माझ्या फंडातून १ कोटी रुपये दिले आहेत. त्यातून मुस्लिम समाजातील गरीब घरातील मुलांसाठी चांगली मैदाने विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

येथील महिला-तरुणी सुरक्षित राहाव्यात याठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. याठिकाणी संत ताजुद्दीन बाबांच्या नावाने मोठे हॉस्पिटल उभारण्याची योजना आहे. तेथे गरिबांना चांगले उपचार मिळतील.’ ‘ताजबागचा विकास करताना कुणाचेही घर, हॉटेल तोडले जाणार नाही. इथे राहणाऱ्या लोकांना चांगले घर देण्याचा, दुकानांसाठी मॉल बांधण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून येथील महिला-पुरुष आपल्या कौशल्याच्या जोरावर रोजगार कमावता आला पाहिजे,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. 

‘मुस्लीम समाजातील लोकांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे, त्यांच्यातील कौशल्य विकसित केले पाहिजे. उर्दूसोबत इंग्रजीचेही ज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. आपल्या येथील अनेक मुस्लिम तरुणांना अबूधाबी, दोहा, दुबईमध्ये रोजगार मिळाला कारण त्यांनी उर्दूसह इंग्रजी भाषेचेही ज्ञान आत्मसात केले. त्यांना शिक्षणामुळे आणि अनुभवामुळे रोजगार मिळाला,’ याचाही ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. 

१४ हजार मुले इंजिनियर झाली

माझ्या कोट्यातून एक इंजिनियरींग कॉलेज मिळाले होते. मी स्वतःचे कॉलेज सुरू करू शकलो असतो. पण ते काम काँग्रेसच्या नेत्यांचे आहे. मी माझ्या कोट्यातील कॉलेज अंजूमन इस्लाम सोसायटीला दिले. आज त्याच कॉलेजमधून १४ हजार मुस्लिम मुले इंजिनियर झालीत, असेही ना. श्री. गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *