- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : पद्मश्री पुरस्कार हा निःस्वार्थ सेवेची पावती – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : शंकरबाबा पापळकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. संजीव चौधरी यांचा सत्कार

नागपूर समाचार : निःस्वार्थ व समर्पित भावनेने गोरगरीबांची सेवा करतानाच सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. संजीव चौधरी तसेच समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी केले आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी (शनिवार) काढले.

वनामती येथील सभागृहात आदिवासी विकास विभागातील अधिकारी, आदिवासी वैद्यकीय संघटना तसेच ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ना. श्री. नितीन गडकरी बोलत होते. मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम व अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तर अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांचा प्राइड ऑफ इंडिया या सन्मानाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे होत्या. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, माजी महापौर मायाताई इनवाते, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, माजी आमदार श्री. पारवे, विलास राऊळकर, अरुण पवार, आर.डी.आत्राम, उपायुक्त दशरथ कुळमेथे, डॉ. पुरुषोत्तम मडावी, नयन कांबळे, विदर्भ प्रदेश प्रमुख दीपक मडावी उपस्थित होते. 

‘अनाथ-दिव्यांगांसाठी आयुष्यभर झटणारे पद्मश्री शंकरबाबा पापळकर, उमरेडसारख्या छोट्याशा शहरातून येत न्युरोलॉजिस्ट म्हणून जगभरात स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करणारे पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम आणि संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे रंजल्या-गांजल्यांची सेवा करणारे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी हे तिघेही समाजाचे वैभव आहेत,’ या शब्दांत ना. श्री. नितीन गडकरी यांनी गौरव केला. डॉ. चंद्रशेखर मेश्राम व डॉ. संजीव चौधरी यांनी व्यावसायिकतेपेक्षा निःस्वार्थ व समर्पित भावनेने काम करण्याला प्राधान्य दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *