- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘अजात शत्रु : हमारे अपने भैयाजी पं. बच्छराजजी व्यास’ या हिंदी पुस्तकाचे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन

पं. बच्छराज व्यास यांनी प्रतिकूल परिस्थितीत जनसंघाचे कार्य जिवंत ठेवले

नागपूर समाचार : देशात जनसंघाचे काम करणे खूप आव्हानात्मक होते. त्या काळात अपमानजनक वागणूक मिळायची. विरोधकांनी प्रतिमा वाईट करण्याचा प्रयत्न केला होता. अशावेळी कुठल्याही गोष्टीची चिंता न करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक पं. बच्छराज व्यास यांनी जनसंघाचे कार्य जीवंत ठेवले, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आठवणींना उजाळा दिला.

पं. बच्छराज व्यास स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित सोहळ्यात ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘अजात शत्रु : हमारे अपने भैयाजी पं. बच्छराजजी व्यास’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन झाले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह श्री. भय्याजी जोशी, बैद्यनाथचे संचालक श्री. सुरेश शर्मा, भाजप नेते संजय भेंडे, भाजपचे नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, प्रसिद्ध कवी श्री. सोळंकी, माजी आमदार गिरीश व्यास यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘पं. बच्छराज व्यास हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक होते. ते वकील होते, पण वकिलीपेक्षा समाजसेवा जास्त करायचे. त्यावेळचे मार्गदर्शक प.पू. गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, मोरोपंत पिंगळे या पिढीचे पंडितजींवर खूप प्रेम होते. संघाने त्यांच्यावर जनसंघाच्या कामाची जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी ती अतिशय निष्ठेने पार पाडली. ते अतिशय प्रतिभावान कवी होते. त्यांनी प.पू. डॉ. हेडगेवार यांच्यावर लिहिलेले गीत खूप लोकप्रिय झाले. त्यांची प्रतिभा मुलांमध्ये, नातवांमध्ये देखील आली आहे, हे खूप कौतुकास्पद आहे. कुटुंबाने पंडितजींच्या स्मृती जतन केल्या आहेत, याचा आनंद आहे.’ विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे विदर्भाचे प्रश्न सभागृहात मांडले. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. त्यांचे संघटन आणि नेतृत्व कौशल्य पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श असे आहे, असेही ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले. 

‘संघगीते यावी नव्या स्वरुपात’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक जुन्या स्वयंसेवकांनी प्रेरणादायी गीते लिहिली आहेत. ही सगळी गाणी नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या स्वरुपात यावीत, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्याशी माझी चर्चाही झाली. वेगवेगळ्या भाषांमधील या गीतांचे संकलन होऊन संगीतबद्ध झालीत तर उत्तम होईल असे मला वाटते. भविष्यातील अनेक पिढ्यांमध्ये ही गीते ऊर्जा निर्माण करतील, अशी अपेक्षा ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 

पंडितजींसोबत दीर्घ भेट

माझी आई जनसंघाचे काम करायची त्यावेळी मी आईसोबत अनेकदा पंडितजींच्या घरी गेलोय. एकदा ते मुंबईच्या तेव्हाच्या व्हीटी स्टेशनवर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल) आम्हाला भेटले. गाडीला उशीर असल्यामुळे आम्हाला पंडितजींसोबत बराच वेळ घालवायला मिळाला. ती दीर्घ भेट आजही स्मरणात आहे, अशी एक आठवण ना. श्री. नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *