- Breaking News, PRESS CONFERENCE, खेलकुद , नागपुर समाचार

नागपुर समाचार : नागपूर मध्ये पुनित बालन ग्रुप द्वारा प्रस्तुत सुवर्ण महोत्सवी राज्य ज्यूदो स्पर्धेचे 1 फेब्रुवारी पासून आयोजन

नागपुर समाचार : महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन‌द्वारा आयोजित आणि पुण्यातील सुप्रसिद्ध पुनित बालन ग्रुप यांच्या सौजन्याने 50 वी अर्थात सुवर्ण महोत्सवी राज्य ज्यूदो स्पर्धेचे आयोजन दिनांक 01 ते 05 फेब्रुवारी 2024 दरम्यान दी ज्यूदो असोसिएशन, नागपूर यांच्या सहकार्याने करण्यात आलेले आहे. या स्पर्धा मानकापुर विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न होतील अशी माहिती महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे महासचिव शैलेश टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. धनंजय भर्भोसले, स्पर्धा आयोजन समितीचे सचिव पुरषोतम चौधरी आणि तांत्रिक समितीचे सचिव दत्ता आफळे यांची उपस्थिती होती.

स्पर्धेचा उ‌द्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक 02 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. स्पर्धेचे उ‌द्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे आधारस्तंभ आणि उ‌द्योगपती पुनित बालन यांची प्रमुख उपस्थिती असेल.

दिनांक 04 फेब्रुवारी रविवारी आयोजित स्पर्धेचे पारितोषिक वितरण केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. यावेळी पुनित बालन आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री राजश्री देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. राजश्री देशपांडे यांचा नुकताच ‘सत्यशोधक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला आहे. विविध ओटीटी मालिकांमध्ये काम केलेल्या राजश्री यांची आणखी वेगळी ओळख म्हणजे त्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील ज्यूदो संघटनेच्या खेळाडू असून त्यांनी ज्यूदो वर्गात नियमित प्रशिक्षण घेतले आहे. स्पर्धाच्या दरम्यान आदरणीय नामदार सुधीरजी मुनगंटीवार, वन मंत्री, महाराष्ट्र राज्य आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच माननीय नामदार आणि क्रीडामंत्री संजयजी बनसोडे हे खेळाडूंना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी भेट देतील. दिनांक 04 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे आयोजित शासकीय कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार येणार असल्याने त्यांचीही स्पर्धस्थानी भेट अपेक्षित आहे.

वर्ष 1973 पासून अखंडितपणे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे 50 वे वर्ष आहे. प्रथम काही वर्ष याचे पुण्यात आयोजन होत होते पण जसजसे संघटनेच्या प्रयत्नामुळे ज्यूदोचा प्रचार-प्रसार वाढत गेला तशी संघटनेची व्याप्ती वाढत जाऊन नवनवीन जिल्हे संलग्न होवू लागले आणि या स्पर्धा राज्यातील विविध जिल्ह्यातून आयोजिल्या गेल्या. आज राज्यातून 33 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. याशिवाय शासनाची क्रीडा प्रबोधिनी या संस्थेसह राज्याच्या पोलिस विभागाच्या संघास वेगळी ओळख देवून त्यांच्या ज्यूदो संघांना खुल्या राज्य ज्यूदो स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात येतो.

विविध चषक आणि पदकांची लयलूट

पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक यासह नंदुरबार, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा जिल्हयांचे 33 संघ दिनांक 01 फेब्रुवारी रोजी नागपूर शहरात दाखल होतील, स्पर्धेमध्ये बाल गट, कुमार गट, युवा गट आणि वरिष्ठ गट म्हणजेच सबज्युनियर्स, कॅडेट, ज्युनियर्स आणि सिनियर्स अशा विविध वयोगटातील आणि वजनगटातील मुले आणि मुली खेळाडू सहभागी होतील, स्पर्धेमध्ये एकूण 64 विविध वजनगट आहेत आणि एकूण 1150 खेळाडूंमधून प्रत्येक वजनगटात चार विजेते (सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि कांस्य) असे एकूण 256 विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. याशिवाय सामूहिक मुला-मुलींच्या सांघिक विजेतेपदाचा पुनित बालन ग्रुप पुरस्कृत एक चषक आणि दोन सांधिक उपविजेते चषक दिले जातील. हे दोन उपविजेते चषक सिटी कॉपरिशन, पुणे आणि लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, पुणे यांनी पुरस्कृत केलेले आहेत. वयोगटाप्रमाणे चार भाग असणाऱ्या खेळाडूंच्या प्रकारातील विजेते असणाऱ्या सांघिक चषकांमध्ये विजेतेपदाचे चार आणि उपविजेतेपदाचे चार असे आठ चषक प्रदान केले जातील.

या पन्नासाव्या प्रतिष्ठीत आणि महत्वाकांक्षी स्पर्धेनिमित संघटनेने विशेष प्रयत्न करून पंचांना गणवेशाचा भाग असणारे ब्लेजर, सॉक्स, टाय आणि क्रेस्ट देणार असून सहभागी सर्व खेळाडूंना एक विशेष भेटवस्तू संघटनेतर्फे दिली जाईल.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा थरार

स्पर्धेमध्ये समीक्षा शेलार, अपूर्वा पाटील, स्नेहल खावरे, रोहिणी मोहिते यासारखे प्रथितयश आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असून यांच्या नेत्रदीपक तंत्राचे कौशल्य प्रेक्षकांना पाहावयास मिळेल. स्पर्धेसाठी तज्ञ 75 पंचांची नियुक्ती करण्यात आलेली असून यामध्ये जवळपास नऊ जण आंतरराष्ट्रीय पंच आहेत. या स्पर्धेचे संचालक ‘साई’ या केंद्रीय संस्थेचे हाय परफोरमनन्स मॅनेजर योगेश धाडवे आहेत. योगेश हे कॉमनवेल्थ गेम्समधील रौप्यपदक विजेते असून ते अंतरराष्ट्रीय पंच आहेत. स्पर्धेसाठी एकूण चार मॅट एरिया लावण्यात आलेला असून स्पर्धा संचालनासाठी ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडियाचे स्पोर्ट कमिशनचे प्रमुख अरुण द्विवेदी, शेख शरीफ आणि पी. किशोर (सर्वजण छत्तीसगड) यांना पाचारण करण्यात आलेले आहे. या सर्व एकूण परिश्रमाचा उद्देश या स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरच्या आयोजनाच्या व्हाव्यात हा संघटनेचा प्रयत्न आहे.

संघटनेच्या वतीने नागपूरकरांना आवाहन करण्यात येते की या स्पर्धेला येवून खेळाचा आस्वाद घ्यावा आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. पत्रकार परिषदेस नागपूर ज्यूदो संघटनेचे सचिव मुकुंद डांगे आणि प्रकाश मांडोकार यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *