नागपूर समाचार : राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर विदर्भासह नागपूर शहरातदेखील पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या पावसामुळे उकड्यापासून जरा दिलासा मिळाला.
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर नित्यनेमाने पावसाने हजेरी लावली आहे. प्रत्येक दिवसाला हजेरी लावणार्या पावसाने मागील आठवड्यापासून दडी मारली. आभाळ दाटून आले, असे भासत असल्यानंतरही पाऊस काही येत नव्हता. त्यामुळे सकाळी उन्ह आणि दुपारी व संध्याकाळी ढगाळ वातावरणामुळे उकड्यात वाढ झाली होती. कूलर, पंखेदेखील काम करीत नसल्यामुळे नागरिकांची रात्रीची झोप उडाली होती. दरम्यान, मंगळवारी (ता.३0 जून) सकाळी उन्हाचे वातावरण होते. दुपारी आकाश ढगाळ झाले. संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे हवेत गारवा पसरला. दरम्यान, शहरातील विविध चौकात आणि रस्त्यांवर पाणी साचले.
अनेक ठिकाणी रस्ते ओसांडून वाहत होते. पाऊस गेल्यानंतर पाण्याचा निचरा झाला. शहरात सर्वत्र सारखाच मुसळधार पाऊस झाला. दुपारी उकड्याचे वातावरण गारव्यात परावर्तित झाले. यातून नागरिकांनाही दिलासा मिळाला. दरम्यान, पावसानंतर काही परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याच्या तक्रारी अग्निशन विभागाला प्राप्त झाल्या. त्यानंतर विभागाच्या कर्मचार्यांनी मोर्चा सांभाळला.
काल रात्री ९ च्या सुमारास सुरु झालेला पाऊस रात्रभर बरसला. त्यामुळे वातावरणात चांगलाच थंडावा आला होता, सकाळीही काही काळ वातावरण ढगाळच होते. सकाळी ९ नंतर सूर्यदेवाचे दर्शन झाले. रात्रभर बरसलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. परिणामी आज बऱ्याच ठिकाणी पेरणीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.