- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : मंदिर स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने मंदिर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान

नागपूर समाचार : दिनांक २२,जानेवारी २०२४.पौष शुद्ध द्वादशी रोजी रामलला जन्मभूमिवर विराजमान होणार आहेत.भारताचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी त्यानिमित्ताने दिनांक १४ जानेवारी पासून सर्व मंदिरांना आपले मंदिर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या हिंदू संस्कृतीत स्वच्छतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. अस्वच्छतेमुळे अनावश्यक जंतू निर्माण होतात ज्याचा संसर्ग झाल्यास रोगराई पसरते. अस्वच्छता मग ती कोठेही असो ती हानिकारकच असते.शरीरातील अस्वच्छता असो किंवा आजुबाजूच्या परिसरातील अस्वच्छता असो.

शरीरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीत सात्विक जीवनशैली जगण्याचे मार्गदर्शन केले आहे.सात्विक जीवनशैली मुळेमाणूस श्रद्धायुक्त होतो त्याच्याठायी एक शक्ती तयार होते जी सहजगत्या मानव कल्याणा करता कार्यरत होते.

भारतीय संस्कृतीतील ऋषी,मनीषी यांनी म्हणूनच स्वच्छतेचे महत्त्व जाणले होते.मी नेहमीच सांगत असतो की हिंदू संस्कृतीतील ऋषी आणि मुनिंना केवळ ईश्वर आराधना करणारे दैवी पुरुष म्हणून पाहू नका.ते सर्व महानुभाव मूलतः मानवकल्याणा करता संशोधन करणारे शास्त्रज्ञ होते.हिंदू धर्मातील परंपरांना शास्त्रीय आधार आहे.हा शास्त्रीय आधार माहीत नसल्याने आपण कधी कधी त्यांना अंधश्रद्धा ठरवून मोकळे होतो.

करोना काळात जगण्याची जी जीवनशैली तथाकथित आधुनिक जगताने स्वीकारली नव्हे त्यांना ती स्वीकारावी लागली होती. भारतीय संस्कृतीतील सामान्य जीवनशैलीच होती ती. शेकहेंड न करता दोन्ही हात जोडून नमस्कार करणे म्हणजे एकमेकाला स्पर्श होत नाही.ही पद्धत जगाने झक्कत स्वीकारली.आमच्या पूर्वजांनी मात्र हजारो वर्षापूर्वीच अभिवादनाची ही पद्धत आम्हाला दिली होती. न्यूनगंडाची लागवण झाल्यामुळे आम्ही सुद्धा शेकहेंड करायला लागलो होतो तो भाग वेगळा.

भारतीय संस्कृतीत रोज सकाळी आंगण झाडणे सडा घालणे आणि दारात रांगोळी काढणे या परंपरेमागची मुळ भावना ही स्वच्छताच आहे. देवपूजा करताना सोवळे नेसून पूजा करणे यामागे सुद्धा स्वच्छता हाच हेतू आहे.हिंदू संस्कृतीनुसार झाडणी,केरसुणी ही लक्ष्मीची रूपे आहेत. अजूनही म्हणूनच दिवाळीत लक्ष्मीपूजनाला नवीन केरसुणी विकत घेऊन तिची सुद्धा पूजा करतात. थोडक्यात काय तर मानवजीवनातील स्वच्छतेचे महत्व हिंदू धर्माने ओळखून त्याला खतपाणी घालण्याचे अनेक प्रयोग हे परंपरा म्हणून विकसित केले.ज्याला तथाकथित पुरोगामी प्रवृत्तींनी अंधश्रद्धा म्हणून अधोरेखित केले.

भारतीय संत सज्जनांनी सुद्धा त्यांच्या समाजकार्यात स्वच्छतेला अग्रस्थान दिले हे इथे उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा यांनी तर स्वच्छता हेच जीवनकार्य म्हणून स्वीकारले होते.

आधुनिक भारताच्या इतिहासात किंवा स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांच्या समस्यांचा, प्राचीन जीवन पद्धती आणि वर्तमान जीवनशैली यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यावर योजना करणाऱ्या नेतृत्वाचा अभाव निर्माण झाल्यामुळे अनेक गौरवशाली हिंदू परंपरा अडगळीत पडल्या.

सुदैवाने २०१४ साली मात्र नरेन्द्र मोदी यांच्या रूपाने एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व भारताला मिळाले आणि त्यांनी १५ऑगस्टच्या आपल्या पहिल्या वहिल्या लालकिल्ल्यावरील भाषणात स्वच्छ भारताची घोषणा करून लाखो शौचालये बांधून त्याला कृतीची जोड दिली.

आज परत एकदा राममंदिर निर्माण निमित्ताने त्यांनी देशातील सर्व मंदिरांना दिलेले स्वच्छतेचे आवाहन हे म्हणूनच केवळ भावनिक आवाहन नसून अतिशय व्यवहारिक तर आहेच पण दूरदृष्टीचे आहे.समाजातील मंदिरांनी यानिमित्ताने केवळ मंदिरच नव्हे तर आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ करण्याचा प्रकल्प कालबध्द कार्यक्रमाच्या माध्यमातून जर अखंड राबविण्याचा संकल्प केला तर करोडो भाविक स्वच्छता या विषयाशी जुळतील आणि देशातील रोगराई कमी होईल,नागरिकांचा जीवनस्तर उंचावेल.देशाचे चित्र पालटेल.परंपरेतून प्रगतीचा अनोखा संदेश पंतप्रधानांनी या मंदिर स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने भारतीयांना दिला आहे.

तो डोळसपणे पाहण्याची आणि कृतीची नितांत आवश्यकता आहे.समाजातील मठ मंदिरांनी तो ओळखावा आणि श्रध्देने राबवावा ही कृतीचं रामरायाची आपल्या स्थानिक पातळीवर प्राणप्रतिष्ठा केल्याचे निदर्शक ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *