- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार, मनोरंजन

नागपूर समाचार : ‘सत्यशोधक’ चित्रपट ५ जानेवारीला रिलीज होणार 

फुले दाम्पत्यामुळे महिलांना शिक्षणाचा योग्य मार्ग गवसला – संदीप कुलकर्णी

नागपूर समाचार : ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची ऊर्जा दिली होती. त्या दोघांनी समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवला. त्यामुळेच आज महिला उच्च शिक्षण घेत आहेत, मोठ्या पदावर काम करत आहेत, असे मत अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.‌ संघर्ष, विरोध पत्करुन प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरुन स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य ‘सत्यशोधक’ हा चित्रपट नवीन वर्षात रिलीज होत आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज हॉटेल हरदेव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. संदीप कुलकर्णी यांनी या चित्रपटात ज्योतिराव फुले यांची भूमिका केली आहे.

नुकत्याच आलेल्या ट्रेलरमुळे आणि म. ज्योतिराव-सावित्रीबाई यांच्या लूकमुळे चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. आता हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या टिझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. आता रिलीज झालेल्या ट्रेलरमुळे म. फुले आणि सावित्रीमाईंच्या माहीत नसलेल्या पैलूंची उलगड या ट्रेलरमध्ये होते, यामुळे चित्रपट‌नक्की कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले.

समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित- दिग्दर्शित, संकल्पना – राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे‌आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. 

विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट 5 जानेवारी, 2024 रोजी‌ प्रदर्शित होईल. पत्रकार परिषदेला निर्माते राहूल वानखेडे, हर्ष तायडे, कांचन वानखेडे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *