- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : माझी माती-माझा देश” हे अभिनव अभियान ‘मिट्टी को नमन वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान नागपूर शहरात राबविण्यात येणार

नागपूर समाचार  : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत मातृभूमीची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या समस्त वीरांना नमन करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी याकरिता ‘मेरी माटी-मेरा देश’ अर्थात “माझी माती-माझा देश” हे अभिनव अभियान ‘मिट्टी को नमन वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान नागपूर शहरात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.८) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री निर्भय जैन उपस्थित होते.

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान अंतर्गत शहरामध्ये शिलाफलकम्, पंच प्रण प्रतिज्ञा+सेल्फी, वसुधा वंदन, वीरों का वंदन आणि ध्वजारोहण+राष्ट्रगीत या बाबी राबविण्यात येणार आहेत. शहरातील निवडक मनपा शाळांमध्ये शिलाफलकम् ची उभारणी करण्यात येणार आहे. यावर स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान ‍दिलेल्या अश्या थोर व्यक्तींची नावे शिलाफलकम् वर राहणार आहे. 

पंच प्रण प्रतिज्ञा+सेल्फी करिता शहरातील विविध ठिकाणी ७५ सेल्फीस्टँड / पॉईंट उभारण्यात येतील. या ठिकाणी नागरिकांना आपल्या हातात मातीचा दिवा घेऊन प्रतिज्ञा घेत सेल्फी काढायची आहे. सेल्फी पॉईंटवर लावलेले क्यूआर कोड स्कॅन करून आपण काढलेला सेल्फी अपलोड करायचा आहे. या अभियानामध्ये शहरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले असून अनेक संस्थांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील सेल्फी पॉईंटचे पालकत्व देखील स्वीकारले आहे.

शहरात विविध उद्यानांमध्ये तसेच अन्य मोकळ्या जागी ७५ स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून वसुधा वंदन केले जाईल. या अंतर्गत चिंचभवन येथील ‘अमृत वाटिका’ येथे १००० वृक्ष लावण्यात येतील. नागरिकांना झोन स्तरावर तयार करण्यात आलेल्या वितरण स्थळावरून नि:शुल्क रोपटे वितरीत करण्यात येणार आहेत. देशासाठी प्राणाची आहुती देणारे तसेच देशाच्या सुरक्षेसाठी आपली बहुमूल्य सेवा देणा-या वीरांचे वंदन या अभियानामध्ये केले जाणार आहे. या अंतर्गत शहरातील स्वातंत्र्य सैनिक, लष्कराचे, निमलष्कराचे, पोलीस दलाचे वीर जवान किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मागील वर्षी राबविण्यात आलेला ‘हर घर तिरंगा’ अभियान यंदा १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये प्रत्येक घरी राष्ट्रध्वज लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे दीड लाख राष्ट्रध्वज मनपा शाळांचे विद्यार्थी आणि झोपडपट्टी भागांमध्ये नि:शुल्क वितरीत करण्यात येणार आहेत. नागरिकांनी राष्ट्रध्वज लावल्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत देखील म्हणण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सेल्फी स्पर्धेचे आयोजन

‘मेरी माटी-मेरा देश’ अभियानांतर्गत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान सेल्फी स्पर्धेचे आयोजन मनपाद्वारे करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती मनपाच्या www.nmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सेल्फी स्पर्धा चार वयोगटात घेण्यात येणार आहे. ७५ वर्षावरील वयोगट, १८ ते ७४ वयोगट, १० वर्षांखालील मुले-मुली आणि कुटुंबासोबत सेल्फी या चार गटात ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना पारितोषित दिले जाणार आहे. यासाठी प्रत्येक गटातून ३ विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक २ हजार रुपये पुरस्कार दिले जाईल. याशिवाय १० विजेत्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान करण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होणा-या सर्वच सहभागीदारांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. 

स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य

मेरी माटी, मेरा देश उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहरातील स्वयंसेवी संस्था पुढे आलेल्या आहेत. या संस्थांची सोमवारी (ता.७) मनपा आयुक्तांनी बैठक घेतली. यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी निर्धारित पाच बाबींपैकी अनेक बाबींवर काम करण्याची ग्वाही दिली आहे. अनेकांनी सेल्फी पॉईंटचे, वृक्षारोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या अभियानामध्ये सहकार्य करणा-या प्रत्येक स्वयंसेवी संस्थेला मनपाद्वारे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थेला विशेष पुरस्कार देउन गौरविण्यात येणार आहे.

मनपा अधिकारी व कर्मचारी बुधवारी घेणार पंच प्रण प्रतिज्ञा

‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभिनव अभियानाच्या अंतर्गत बुधवार ९ ऑगस्ट रोजी नागपूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी पंच प्रण प्रतिज्ञा घेणार आहेत. मनपाचे दहाही झोन कार्यालय आणि मनपा मुख्यालयातील हिरवळीवर सकाळी १० वाजता पंच प्रण प्रतिज्ञा घेतली जाईल व सेल्फी काढण्यात येईल. काढण्यात येणारी सेल्फी शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *