- Breaking News

नागपूर समाचार : स्मार्ट सिटी मिशनच्या वर्धापन दिनी नागरिकांनी जाणून घेतली प्रकल्पांची माहिती

स्मार्ट सिटी मिशनचा ८ वा वर्धापन दिन

नागपूर समाचार  : स्मार्ट सिटी मिशनचा ८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा होत आहे. यानिमित्ताने नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने काही पायभूत सुविधा निर्माण करण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. या अंतर्गत शुक्रवारी (ता.२३) नागपूर शहरातील नागरिकांना स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली. नागरिकांनीही स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती जाणून घेतली व कामाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी लवकरच नागपूर स्मार्ट सिटी म्हणून वाटचाल पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.

देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ८ वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीची संकल्पना मांडली आणि देशभरातील १०० शहरांचा यात समावेश करण्यात आला होता. नागपूर स्मार्ट सिटीचा सुद्धा या १०० शहरांमध्ये समावेश आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात नागरिकांना नागपूर स्मार्ट सिटीबद्दल माहिती देण्यात आली. शुक्रवारी सकाळी नागरिकांनी एरिया बेस्ड डेव्हलपमेंटच्या ठिकाणी पूर्व नागपुरात प्रकल्प बाधित नागरिकांसाठी सुरु असलेल्या ‘होम स्वीट होम’ या मोठ्या इमारतीची पाहणी केली. या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. तसेच नागरिकांनी पूर्व नागपुरातील प्रकल्पस्थळी सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. नागरिकांसाठी टेंडर शूअर पद्धतीने रस्त्याचे कामे केले जात आहे. यावेळी माजी नगरसेवक दिपक वाडीभस्मे, वैशली रोहणकर उपस्थित होते.

दुपारी नागरिकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलीसकडे असलेली मोबाईल सर्व्हेलिअन्स व्हॅनची पाहणी केली. तसेच श्रद्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला देखील भेट दिली. विविध कंपन्यांचे कंपनी सचिव माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे तज्ञ, ईरा इंटरनॅशनल शाळेतील शिक्षक यावेळी उपस्थित होते. त्यांनी नागपूर शहरातील गुन्हे नियंत्रण करण्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या केंद्राची माहिती प्राप्त करून घेतली. रस्त्यावर होणाऱ्या अपघाताचे कारण दाखविणारी चित्रफीत सुद्धा त्यांना दाखविण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याची विनंती करण्यात आली. याप्रसंगी मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, कंपनी सचिव भानुप्रिया ठाकूर, मोबिलिटी विभागाचे प्रमुख राजेश दुफारे, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. शील घुले, मुख्य नियोजनकार राहुल पांडे, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर, मोईन हसन, श्रीकांत अहिरकर, अनूप लाहोरी, कुणाल गजभिये, अपूर्वा फडणवीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *