- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : 5 जणांचा बळी घेणाऱ्या ताडोबातील ‘शिकारी’ वाघाचा मृत्यू

नागपूर समाचार : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील कोलारा भागात पाच जणांचे बळी घेणार्‍या आणि केटी१ नावाने ओळखल्या जाणार्‍या वाघाचा सोमवारी सकाळी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात मृत्यू झाला. अत्यंत धडधाकट समजल्या जाणार्‍या या वाघाला पकडून काही दिवसांपूर्वीच गोरेवाडा येथे आणले गेले होते आणि त्याला क्वारंटाइन करून ठेवले गेले.

ताडोबाजवळील परिसरात तेंदूपत्ता आणि सरपण जमा करायला गेलेल्या ग्रामस्थांवर हल्ले करून या वाघाने चार महिन्यात पाच जणांचे बळी घेतले होते. त्यामुळे, १० जून रोजी या वाघाला जेरबंद करण्यात आले आणि ११ जून रोजी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात पाठविण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाड्यात आणल्यापासून या वाघाच्या खाण्यावर परिणाम झाला होता. बंदिस्त वातावरणात जुळवून घेणे त्याला कठीण गेले. सुरुवातीचे सलग तीन दिवस काहीही न खाता खाल्ल्यावर त्याने खाणे सुरू केले होते. गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे तज्ज्ञ या वाघावर उपचार करीत होते. या वाघाची प्रकृती अत्यंत चांगली होती आणि आजारपणाची कोणतीही लक्षणे त्याच्यामध्ये नव्हती.

सोमवारी सकाळी प्राणी बचाव केंद्राचे कर्मचारी या वाघाच्या पिंजर्‍याजवळ गेले असता हा वाघ मृतावस्थेत आढळला. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी गोरेवाडा येथील रुग्णालयात या वाघाचे शवविच्छेदन केले. गोरेवाडा परिसरात या वाघाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूर पशुवैद्यकीय कॉलेजच्या डॉ. माधुरी हेडाऊ, डॉ. मयूर पावशे, डॉ. के. सुजिथ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे हेमंत कामडी, मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते, डॉ. शिरीष उपाध्ये, गोरेवाडा येथील विभागीय व्यवस्थापक नंदकुमार काळे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दुखापतीमुळे या वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज गोरेवाडा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *