- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : पतोडी आवडते हिरो तर मधुबाला आवडती हिरोईन – सुनील गावस्कर

सुनील गावस्‍कर यांची चौफेर फटकेबाजी 

नागपूर समाचार : क्रिकेट विश्‍वातले अतिशय देखणे व्‍यक्तिमत्‍व असलेले टायगर पतौडी हे माझे हिरो होते आणि ब्‍लॅक अँड व्‍हाईट चित्रपटातील अतिशय देखणी अभिनेत्री मधुबाला ही माझी आवडती हीरोईन होती, असे अनेक चित्रपट, क्रिकेट विश्‍वातील किस्‍से सांगून सुप्रसिद्ध क्रिकेटपटू, समालोचक, लेखक सुनील गावस्‍कर यांनी चौफेर फटकेबाजी केली.

प्रसंग होता सप्‍तक नागपूर व छाया दीक्षित वेलफेअर फाउंडेशन यांच्‍या संयुक्‍त वतीने आयोजित ‘स्‍ट्रेट ड्राईव्‍ह’ या सुनील गावस्‍कर यांच्‍याशी गप्‍पाच्‍या कार्यक्रमाचा. कविकुलगुरू कालिदास सभागृहात क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम प्रस्‍थापित करणारे सर्वांचे लाडके ‘लिटल मास्‍टर’ सुनील गावस्‍कर यांची मुलाखत सुप्रसिद्ध क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी घेतली. सभागृहात गावस्‍कर यांचे आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

छाया दीक्षित फाउंडेशनचे सुरेश दीक्षित यांनी सुनील गावस्‍कर व सुनंदन लेले यांचे स्‍वागत केले. कार्यक्रमाला परसिस्‍टंट सिस्‍टीमचे समीर बेंद्रे, प्रकाश दीक्षित, डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्‍यासह अनेक मान्यवर उपस्‍थ‍ित होते. सुनील गावस्‍कर यांनी लता मंगेशकर, अम‍िताभ बच्‍चन, सचिन तेंडुलकर अशा अनेकांच्‍या आठवणींना यावेळी उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उदय गुप्‍ते यांनी केले तर आभार प्रदर्शन मेधा दीक्षित यांनी केले.

मुंबईत क्रिकेटचे संस्‍कार : मुंबईच्‍या दादर युनियन क्रिकेट क्‍लबमधील शिस्‍तीबद्दल बोलताना सुनील गावस्‍कार म्‍हणाले, तेथे अतिशय कडक शिस्‍त होती. टॉसच्‍या नंतर आलेल्‍या खेळाडूला टीमच्‍या बाहेर काढले जायचे. मॅचला येताना बुट, कपडे पांढरे स्‍वच्‍छ असावे, असा आग्रह असायचा. लवकर झोपणे, लवकर उठणे, मॅचच्‍या आधी मैदानावर पोहोचणे, असे अनेक नियम होते. आमच्‍यावेळी ट्रेनमधून प्रवास करताना वरिष्‍ठांचा सहवास लाभायचा, त्‍यांच्‍याकडून जे शिकायला मिळायचे. ती संधी आता विमानप्रवासामुळे कमी झाल्‍याची खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. 

गॅरी कृपेमुळे घडले करियर : वेस्‍ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांचे अनेक किस्‍से सुनील गावस्‍कर यांनी सांगितले. किग्‍स्‍टंन क्रिकेट क्‍लबमध्‍ये बारावा खेळाडू म्‍हणून खेळताना गॅरी सोबर्स यांनी अतिशय सोपा झेल दिल्‍यामुळे संघात माझे स्‍थान निश्चित झाले होते. दुस-या टेस्‍टमध्‍ये चार नंबरवर खेळत असताना गॅरी सोबर्सला छातीला चेंडू लागला आणि त्‍यानंतर मी पहिले शतक ठोकले. त्‍यामुळे माझे क्रिकेटचे करिअर ही ‘गॅरीकृपा’ असे सांगताना सचिन तेंडुलकर यांनी गॅरी सोबर्स बॅटींगला जाताना त्‍यांना कसे स्‍पर्श करून जायचे आणि शतक ठोकायचे याचाही किस्‍सा सांगितला. शेवटच्‍या सामन्‍यात अजित वाडेकरांनी गावस्‍कर यांना बाथरूममध्‍ये बंद करून ठेवल्‍यामुळे गॅरीला त्‍यांना स्‍पर्श करता आला नाही ते लवकर आऊट झाले, हा किस्‍सा सांगितला तेव्‍हा सभागृहात एकच हशा पिकला. 

सामाजिक कार्यातही सक्रीय : सुनील गावस्‍कर सामाजिक कार्यातही सक्रीय चॅम्‍प्‍स फाउंडेशनच्‍या माध्‍यमातून आर्थिकदृष्‍ट्या कमकुवत असलेल्‍या माजी आंतरराष्‍ट्रीय खेळाडूंना 1999 पासून नियमीतपणे आर्थिक मदत करत आहेत. याशिवाय, हार्ट टू हार्ट फांडंडेशनच्‍या माध्‍यमातून ते दरवर्षी 35 शतकांची आठवण म्‍हणून 35 शस्‍त्रक्रिया स्‍वखर्चाने करतात. साई संजिवनी हॉस्‍पीटलचे देशविदेशातील शाखांमध्‍येही ते सक्रीय आहेत. मुलगा रोहनला मी चांगला माणूस होण्‍याचा नेहमीच सल्‍ला देतो. देण्‍यामध्‍ये जो आनंद आहे तो घेण्‍यामध्‍ये नाही, असे नेहमीच सांगत असतो, असे गावस्‍कर म्‍हणाले. 

अशीही गुगली : सुनंदन लेले यांनी पर्सिस्‍टंट सभागृहात मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित असलेल्‍या श्रोत्‍यांना एक गुगली टाकली. त्‍यांनी सभागृहातील खुर्च्‍यामध्‍ये दहा चिक्‍की लपवून ठेवण्‍यात आल्‍याचे सांगितले. ज्‍यांना ही चिक्‍कीची पाकिटे सापडली, त्‍या दहा जणांना सुनील गावस्‍कर यांचे हस्‍ताक्षर असलेले क्रिकेट बॉल भेट देण्‍यात आले व त्‍यांच्‍यासोबत फोटो काढण्‍याची संधीही मिळाली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *