- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : कुष्ठरोग निर्मूलनासाठी जनजागृती आवश्यक – विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे

कुष्ठरोग जनजागृती दौड उत्साहात

नागपूर समाचार : कुष्ठरोग या आजारासंदर्भात समाजात आजही अनेक अंधश्रद्धा आहेत. कुष्ठरोग निर्मूलनासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे यांनी आज येथे केले.

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेमार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आज सकाळी 7 वाजता फ्रीडम पार्क झिरो माईल मेट्रो स्टेशन येथून मॅरेथॉन दौडचे आयोजन करण्यात आले होते. दौडनंतर आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमात डॅा. खोडे बोलत होत्या.

 कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, आरोग्य उपसंचालक डॅा. विनिता जैन, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील, पोलिस उपायुक्त राहुल मदने, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. दीपक सेलोकार, कुष्ठरोग आरोग्य सेवेच्या सहाय्यक संचालक डॉ. दीपिका साकोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

देवीचे भारतातून संपूर्णपणे निर्मूलन करण्यात आले आहे. त्याप्रमाणेच देशातून कुष्ठरोगाचे निर्मूलन होण्याची गरज आहे. आजही अनेक भ्रामक कल्पना ह्या कुष्ठरोगासंदर्भात आहेत. त्या दूर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. खोडे यांनी यावेळी केले.

तत्पूर्वी, आयोजित मॅरेथॉन दौडचा प्रारंभ फ्रीडम पार्क येथून करण्यात आला. त्यानंतर संविधान चौक, आकाशवाणी चौक, विद्यापीठ चौक मार्गे मेट्रो स्टेशन येथे समारोप करण्यात आला. कुष्ठरोगाबाबत समाजात असलेला गैरसमज दूर करीत कुष्ठरोग या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी या दौडचे आयोजन करण्यात आले होते.

मॅरेथान दौड तीन गटामध्ये 15 ते 18 वर्ष, 19 ते 35 वर्ष व 36 वर्षाच्या वर अशी विभागण्यात आली होती. मॅरथॉन दौडसाठी पुरुष व महिला असे गट करण्यात आले होते. विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम विजेत्याला 3 हजार रुपये, व्दितीय 2 हजार रुपये, तृतीय क्रमांकाला 1 हजार रुपये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुष्ठरोग आरोग्य सेवेच्या सहाय्यक संचालक डॉ. दीपिका साकोरे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ उपस्थितांना देण्यात आली.

मॅराथॉन दौडमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी पुरुष व महिला यांना मोफत टी-शर्ट वितरित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *