- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : जावेद अलीच्‍या गीतांवर थिरकली तरुणाई

नागपूर समाचार : इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन (IPCA) आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्तवतीने सुरू असलेल्‍या तीन दिवसीय 72 व्‍या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस मध्‍ये देशभरातून आलेल्‍या विद्यार्थी, प्राध्‍यापक, विविध कंपन्‍या सीईओ, शैक्षणिक संस्‍थांचे अध्‍यक्ष व पदाधिकात्‍यांनी सुप्रसिद्ध गायक जावेद अली यांनी सादर केलेल्‍या सुमधूर गीतांचा आस्‍वाद घेतला. 

राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या परिसरात शुक्रवारी जावेद अली यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट आयोजित करण्‍यात आली होती. जावेद अलीला ऐकण्‍यासाठी तरुणाईने कार्यक्रमाला खचाखच गर्दी केली. जावेद अलीने सादर केलेल्‍या श्रीवल्‍ली, कुनफाया अशा प्रत्‍येक गीताला तरुणाईने उत्‍स्‍फूर्त दाद दिली. जावेद अली यांनी सादर केलेल्‍या सुपरस्‍टार अमिताभ बच्‍चन यांच्‍यावर चित्रित गीतांवर सगळेच थिरकले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसकेबी कॉलेज ऑफ फार्मसीच्‍या सहायक प्राध्‍यापक नेहा राऊत व आरजे श्रुती यांनी केले. यावेळी स्‍थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष अतुल मंडलेकर, असोसिएशन ऑफ फार्मास्‍युटीकल टिचर्स ऑफ इंडियाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष व आयोजन समिती सचिव प्रा. मिलिंद उमेकर, संयोजन सचिव प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ. चंद्रकांत डोईफोडे, संयोजक डॉ. प्रमोद खेडेकर, मनोरंजन समितीचे अध्‍यक्ष डॉ. सतीश साखरखेडे यांची उपस्थिती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते जावेद अली, सहगायिका मनीषा जांभूळकर व त्‍यांच्‍या दहा जणांच्‍या चमूचा सत्‍कार करण्‍यात आला.