- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नागपूर 2025 पर्यंत अपघातमुक्त करण्यास प्राधान्य – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

रस्ते सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन

नागपुर समाचार : मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याची गरज आहे. यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात नागपूर जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहेत. 2025 पर्यंत अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास प्राधान्य असेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज येथे केले. 

यंदा 11 ते 17 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचे उदघाटन नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, महामार्ग पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, शहर वाहतूक पोलिस उप आयुक्त चेतना तिडके, जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार , नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जनआक्रोश या संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, रस्ते अपघातास कारणीभूत ठरणा-या कारणांपैकी एक कारण हे नेत्रविकार असल्याचे आढळून आले आहे. यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहनचालकांची नेत्र तपासणी करण्यात यावी, वाहतूक नियमांची माहिती देणारे ॲप, व्हर्च्युअल ट्राफिक गार्डनची सुरुवात परिवहन विभागामार्फत करण्यात यावी, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. 

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. रस्ते सुरक्षितता हा सर्वच स्तरावरील प्राधान्याचा विषय असायला पाहिजे. रस्ते सुरक्षा सप्ताहादरम्यान जिल्ह्यात रस्ते सुरक्षा जनजागृतीविषयक विविध कार्यक्रम परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. परिवहन विभागाच्या विविध उपक्रमास जि.प.चे सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. अपघात रोखण्यासाठी ‘गोल्डन अवर’ ही संकल्पना, नवीन परिवहन दंड शुल्कांची माहिती सर्वसामान्यांना होण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. 

उदघाटन कार्यक्रमादरम्यान वाहतूक नियमांची माहिती देणा-या ‘रोड रेस’ या परिवहन विभागाने तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले. आभार परिवहन अधिकारी हर्षल टाके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *