- नागपुर समाचार

नागपुर समाचार : ‘त्या’ इंग्रजी माध्यमाच्या शाळा येत्या तीन दिवसात सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करा – प्रा. दिलीप दिवे

शिक्षण विशेष समितीच्या बैठकीत निर्देश

नागपुर समाचार : शहरात प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक अशा एकूण सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निविदा मागविण्यात आली होती. यासंदर्भातील ई-निविदा तात्काळ सुरू करून येत्या नव्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्यासंबंधी पुढील तीन दिवसात कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश शिक्षण विशेष समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी दिले.

विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात शिक्षण विशेष समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, सदस्या रिता मुळे, प्रणिता शहाणे, हर्षला साबळे, सदस्य इब्राहिम तौफीक मोहम्मद, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर यांच्यासह सर्व शाळा निरीक्षक उपस्थित होते.

बैठकीत शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही या विषयासह २०२०-२१ या नव्या शैक्षणिक सत्रात मनपातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षेच्या संदर्भात करण्यात येणारी पूर्वतयारी, मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाबाबत कार्यवाही, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पाठ्यपुस्तकांसंबंधी कार्य, शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीला शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूल बॅग, वाटर बॉटल देण्यासंबंधी घेण्यात आलेल्या ठरावानुसार केलेल्या कार्याची माहिती या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली.

राज्य शासनामार्फत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासंबंधी परिस्थितीचा यावेळी समितीमार्फत आढावा घेण्यात आला. मनपाच्या प्राथमिक गटातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा सर्वे केला असता एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ २९ टक्के विद्यार्थ्यांकडेच अँडरॉईड मोबाईल तर ३३ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी टिव्‍ही आहे. एकूण २२ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल व टिव्‍हीची व्यवस्था आहे तर ३८ टक्के विद्यार्थ्यांकडे दोन्हीपैकी कोणतिही व्यवस्था नाही. माध्यमिक गटामध्येही (इयत्ता नववी ते बारावी) ३५.३५ टक्के विद्यार्थी मोबाईल आणि टिव्‍हीच्या व्यवस्थेपासून वंचित आहेत. माध्यमिक गटात ३५ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल सुविधा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी दिली.

ऑनलाईन शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये हा मनपाचा मानस आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य पुरविण्याची गरज आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मौलिक वर्ष असून त्यांच्यांसाठी प्राधान्याने व्यवस्था होणे आवश्यक आहे. यासाठी येणा-या खर्चासंदर्भात समितीतर्फे ठराव घेण्यात आला असून हा विषय सभागृहात ठेवण्यात यावा, यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. मनपाच्या सर्व शाळांमध्ये सॅनिटाजिंग करण्यात येत आहेत. सर्व शाळा लवकरात लवकर सॅनिटाइज करून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था केली जावी, असेही निर्देश सभापतींनी दिले.

मनपाच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश, पाठ्यपुस्तके, स्कूल बॅग, वाटर बॉटल आदी साहित्य देण्यात यावे. यासंबंधी समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला असून यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *