- Breaking News, क्राईम खबर , नागपुर समाचार

नागपुर समाचार : महिला समाजने पटकावला सक्रीय मंडळ पुरस्‍कार

ग्रामायण सेवा प्रदर्शनाला दुस-या दिवशी वाढती गर्दी 

नागपूर समाचार : ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर महानगरपालिका व पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रामनगर मैदानात कालपासून सुरू झालेल्‍या ग्रामायण सेवा प्रदर्शनाला बघण्‍यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी करीत आहेत. शोभेच्‍या वस्‍तू, वस्‍त्र, विविध प्रकारची झाडे, अलंकार, मिलेट धान्‍य, मातीची भांडी आदी स्‍टॉल्‍स लोकांना आकर्षित करीत आहेत.

ग्रामायण प्रदर्शनाच्‍या दुस-या दिवशी महिला नेतृत्‍व संमेलन पार पडले. यात भाजपाच्‍या व्‍होकल फॉर लोकल सेलच्‍या सहसंयोजक कीर्तीदा अजमेरा, प्रसिद्ध सौंदयतज्ञ विजयश्री खानोरकर, सक्रीय महिला मंडळ स्‍पर्धेच्‍या परीक्षक डॉ. मंगला देशकर व स्मिता होटे यांची मंचावर उपस्‍थ‍िती होती. यावेळी महिला समाज रामनगर सरस्‍वती मंदिरला सक्रीय महिला मंडळ स्‍पर्धेच्‍या प्रथम पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. अभ्‍यंकर नगरच्‍या महिला प्रबोधन मंडळाला द्वितीय तर विरंगुळा ज्‍येष्‍ठ महिला मंडळाला तिसरा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. सखी मंडळ टेलिकॉम नगर व टिळक नगर महिला मंडळाला उत्‍तेजनार्थ पुरस्‍कार देण्‍यात आला.

मिलेटवरील लिखाण स्‍पर्धेत अनंत भोयर यांनी प्रथम, विनीता हिंगे यांनी द्वितीय तर अजिता खडके यांनी तृतीय क्रमांक पटकावला. आभाराणी पटवर्धन व अनुराधा देशमुख यांना उत्‍तेजनार्थ पारितोषिक देण्‍यात आले. पाककृती स्‍पर्धेत रोहिणी देशकर, आयुषी राठोड व निकीता दवंडे यांना अनुक्रमे पहिले तीन पुरस्‍कार देण्‍यात आले. महिला नेतृत्‍व संमेलनाचे सूत्रसंचालन शिल्‍पा मंडलेकर यांनी केले तर प्रास्‍ताविक अनुराधा सांबरे यांनी केले. दिवसभर प्रश्‍नमंजुषा, विजयश्री खानोरकर यांचे सौंदर्य प्रसाधने घरीच कशी बनवावी यांचे मार्गदर्शन, सेंद्रीय व नैसर्गिक पदार्थ विक्री संदर्भात अनुभव कथन, रक्‍तगट तपासणी व रक्‍तदान आदी उपक्रम घेण्‍यात आले.

लाकडी शोभेच्‍या वस्‍तूंचे प्रमुख आकर्षण : निरुपयोगी, टाकाऊ लाकडातून आकर्षक आकाराच्‍या शोभेच्‍या वस्‍तू तयार करणारे भंडा-याचे महादेव साटोणे यांच्‍या हाताची कलाकुसर प्रदर्शनात बघण्‍यासारखी आहे. त्‍यांनी कच-यात फेकून देण्‍यासारख्‍या वस्‍तूंची अतिशय सुंदर कलाकृती तयार केल्‍या आहेत. बांबू आणि बारामसी गवतापासून तयार केलेल्‍या शोभेच्‍या वस्‍तूदेखील बघ्‍यांचे लक्ष वेधून घेत आहेत. लेंटाना-बांबू क्राफ्ट डिंगडोरीच्‍या स्‍टॉलवर मध्‍यप्रदेशच्‍या डिंगडोरी गावातून आलेल्‍या बळवंत रहांगडाले यांनी या लेंटाना किंवा बारामसी गवतापासून वस्‍तू तयार केल्‍या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *