- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आकांत… थरार…अन् सुटकेचा निःश्वास; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्रात्यक्षिक

आकांत… थरार…अन् सुटकेचा निःश्वास; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्रात्यक्षिक

नागपुर समाचार : अंबाझरी तलावात 19 मुले पोहताना पाण्यात बुडाली… अशी वार्ता जणू काही वाऱ्यासारखी परिसरात पसरली…. पोलीस स्टेशनला दूरध्वनी करण्यात आला… जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासही सूचना देण्यात आली… राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलास पाचारण करण्यात आले… तातडीने दलाची कार्यवाही सुरू झाली… अथक प्रयत्नानंतर आपत्ती प्रतिसाद दलास मुलांना वाचविण्यात यश आले…

एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असा हा थरार…आकांत…अन सुटकेचा निःश्वास अनुभवायला मिळाला तो जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकादरम्यान… आज अंबाझरी तलावावर हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. प्रात्यक्षिकादरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आठ मुलांना पाण्यातून बाहेर काढले. तर राज्य प्रतिसाद दलाने 7 मुलांना पाण्यातून वाचविले. महापालिकेच्या अग्निशमन दलाने4 मुलांचे प्राण वाचविले. अशाप्रकारे संयुक्तरित्या हे बचाव अभियान राबविण्यात आले.

दुसऱ्या प्रात्यक्षिकात तलावात पाहणी करताना राष्ट्रीय आपत्ती दलाची नाव पाण्यात उलटल्यामुळे त्यातील सहा व्यक्ती बुडाले. त्यातील चार व्यक्तींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा प्रयत्न करून उर्वरित दोघांनाही बाहेर काढण्यात आले. अशाप्रकारची चित्तथरारक प्रात्यक्षिके राज्य तसेच राष्ट्रीय प्रतिसाद दलाने सादर केली.  

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, अप्पर पोलीस आयुक्त नितीन जगताप, इन्सिडेंट आफिसर म्हणून नागपूरचे तहसीलदार सूर्यकांत पाटील व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे उपकमांडंट पवनदेव गौर, सहायक कमांडंट कृष्णा सोनटक्के, विपीन सिंग यांच्यासह महापालिका, पोलीस तथा संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *