- Breaking News

महाराष्ट्र समाचार : राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते २२ व्या भारत नाट्य महोत्सवाचे उद्‌घाटन

नाटकांच्या माध्यमातून राष्ट्रीयतेची भावना वृद्धिंगत व्हावी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

महाराष्ट्र समाचार : साहित्य, संगीत, नाट्य व कला हे उथळ मनोरंजनाकरिता नसतात, तर  ते अभिरुचीपूर्ण आनंदाकरिता असतात. नाटकांच्या माध्यमातून मनोरंजन निश्चितच व्हावे, परंतु त्यासोबतच राष्ट्रीयतेची भावना व शाश्वत मानवी मूल्ये जागविण्याचे कार्य देखील व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. 

राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्था (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) या संस्थेने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाच दिवसांच्या भारत नाट्य महोत्सवाचे मुंबईत आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी राज्यपाल बोलत होते.

उदघाटन सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक, ज्येष्ठ रंगकर्मी व केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाच्या सदस्या वाणी त्रिपाठी टिक्कू, राष्ट्रीय नाट्य संस्थेचे (एनएसडी) संचालक रमेश चंद्र गौड व पु ल देशपांडे अकादमीचे संचालक संतोष रोकडे प्रामुख्याने होते.

कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून अमृताची बरसात करीत असतात. महाराष्ट्राला तर रंगभूमीची महान परंपरा आहे. नाटकांच्या माध्यमातून थोर स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या जीवनगाथा सांगितल्या गेल्यास लोकांना व युवकांना इतिहासाची माहिती होईल, तसेच राष्ट्रीय नेत्यांचे गुण आत्मसात करण्याची प्रेरणा देखील मिळेल असे राज्यपालांनी सांगितले. राष्ट्रीय नाट्य संस्थेतून अनेक प्रतिभावान कलाकार घडले आहेत. संस्थेतून यापुढे देखील प्रतिभावान कलाकार पुढे येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने आयोजित केलेला नाट्य महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे आणि तो तरुण पिढीसाठी प्रेरणादायक आहे, असे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी यावेळी सांगितले. 

सन १९७९ साली आजच्या दिवशीच आपण राष्ट्रीय नाट्य संस्थेतून पदवी प्राप्त करून मुंबईत आलो होतो. संस्थेने आपल्याला प्रेम दिले, जीवन दिले, कुटुंब दिले आणि जीवन शिक्षणही दिले. या संस्थेतर्फे आपल्याला महोत्सवासाठी बोलावणे हा आपला बहुमान असल्याचे सतीश कौशिक यांनी सांगितले.    

जनतेसाठी खुला असलेल्या या महोत्सवात पाच दिवस पाच नाट्यकृतींचे प्रदर्शन होणार आहे.

उद्घाटन समारंभानंतर लगेचच, चंद्रकांत तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित “आय एम सुभाष” या हिंदी नाटकाचा प्रयोग झाला. दिनांक १० ऑगस्ट रोजी ‘ गांधी-आंबेडकर’ या हिंदी नाटकाचा प्रयोग होणार आहे. “ऑगस्ट क्रांती”, ‘टिळक आणि आगरकर” व ‘रंग दे बसंती चोला’ या नाटकांचे देखील सादरीकरण होणार आहे असे आयोजकांनी जाहीर केले.

वासुदेव पोटभरे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *